बेंगळुरू : प्रख्यात कन्नड लेखक आणि पुरोगामी विचारवंत डॉ. मल्लेशप्पा एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सोमवारी सीआयडीकडे तपास सोपविण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीबीआयकडे तपासाची शिफारस करण्याचे ठरले. कायदा व संसदीय कार्यमंत्री टी.बी. जयचंद्र यांनी पत्रकारांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. सीबीआयने तपास हाती घेण्याची औपचारिकता पूर्ण होईपर्यंत सीआयडीकडे तपासाची सूत्रे राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कलबुर्गी यांची रविवारी धारवाड येथील त्यांच्या निवासस्थानी दोन बंदूकधाऱ्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाने हल्लेखोरांच्या त्वरित अटकेसाठी राज्यव्यापी आंदोलन चालविले आहे. ही घटना घडायला नको होती. डॉ. कलबुर्गी यांची हत्या अत्यंत निंदनीय आहे, असे सिद्दरामय्या यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटले. कोल्हापूरचे पुरोगामी विचारवंत कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्याशी निकटचे संबंध राहिलेल्या ७७ वर्षीय कलबुर्गी यांनाही त्याच पद्धतीने संपविण्यात आल्याने संतापाची भावना बळावत आहे. कलबुर्गी हे नेहमी अंधश्रद्धेविरुद्ध बोलायचे.त्यांनी हिंदू देव-देवतांबद्दल वादग्रस्त विधाने करीत विहिंप आणि बजरंग दलासारख्या कडव्या उजव्या संघटनांचा राग ओढवून घेतला होता. धारवाड येथे सोमवारी असंख्य चाहत्यांनी कलबुर्गी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दारावर थाप पडली असता ते उघडणाऱ्या कलबुर्गी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यांच्या कपाळ आणि छातीत गोळ्या घुसल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. या हत्येप्रकरणी सर्वांगाने तपास सुरू करण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांनी दिली आहे.(वृत्तसंस्था)—————————————————————————वादग्रस्त टिष्ट्वटमुळे खळबळहिंदुत्वाला विरोध करणाऱ्या यू.आर. अनंतमूर्ती आणि आता एम.एम. कलबुर्गी यांना कुत्र्याचे मरण मिळाले आहे. आता आदरणीय के.एस. भगवान यांचा नंबर लागेल, असे टिष्ट्वट बजरंग दलाच्या बांटवाल सेलचा नेता भूवित शेट्टी याने केल्यानंतर खळबळ उडाली आहे. शेट्टीविरुद्ध मंगळूर पोलिसांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे आणि गुन्हेगारी कृत्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. मी माझा राग व्यक्त केला असून मी किंवा माझ्या संघटनेतील कुणी त्यांची हत्या केली असा त्याचा अर्थ काढता येत नाही, असा खुलासाही त्याने केला आहे. भगवान यांची वादग्रस्त विधाने पाहता त्यांना हिंदुत्ववादी संघटनांकडून लक्ष्य ठरविले जाऊ शकते. आमच्या संघटनेचे लोक त्यांची हत्या करतील असा त्याचा अर्थ होत नाही, असेही शेट्टीने टिष्ट्वटरवर नमूद केले.———————————-विचारवंतांचा खून निषेधार्हच - सदानंद मोरेपुणे : तालिबानीकरणाचा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच आहे, असा समज होता. पण ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. मल्लेशाप्पा एम. कलबुर्गी यांच्या हत्येमुळे हे लोण महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून बाहेर गेल्याचे दिसते आहे. लोकशाहीत विचारवंतांचा खून होणे अयोग्यच आहे, अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.कलबुर्गी यांनी सुरक्षा नाकारली म्हणून हत्या झाली, असे म्हटले जात आहे. संरक्षण तरी किती लोकांना पुरविणार? असे प्रकार केवळ संरक्षण देऊन थांबणारे नाहीत. अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे. अशा घटना घडू नयेत, म्हणून योग्य ती यंत्रणा उभारली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.
तपास सीबीआयकडे देणार
By admin | Published: September 01, 2015 2:43 AM