मुंबई - हरित हायड्रोजन निर्मितीसाठी २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक होणार असलेल्या सात प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत तसेच ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या व सहा एमटीपीए क्षमतेच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पासाठी अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया कंपनीसोबत सोमवारी सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून एकूण ९२,४०० रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासन आणि हायड्रोजन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हरित हायड्रोजन संदर्भात प्रभावशाली धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०३० पर्यंत डीकार्बनाईज करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हरित हायड्रोजन तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा समतोल राखून उर्जा निर्मिती करणे शक्य होईल.
निप्पॉन २० हजार, ७ कंपन्या देणार ७२,४०० रोजगारअर्सेलर मित्तलसोबत करण्यात आलेल्या करारामुळे २० हजार तर ७ कंपन्यासोबतच्या करारामुळे ७२,४०० रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे सीईओ विपीन शर्मा, निप्पॉन स्टीलचे उपसंचालक कुबोटा सॅन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित हरलका, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील लोह खाणींना जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान देणारा आहे.
करार झालेल्या सर्व सात कंपन्यांच्या प्रकल्पांची क्षमता ९१० केटीपीए इतकी असेल.
हरित हायड्रोजन विकासकांना सवलतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हरित हायड्रोजनवर फोकस केला आहे. २०३० पर्यंत ५०० केटीपीए इतका हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्य सरकारने हरित हायड्रोजन विकासकांना विविध सवलती देऊ केलेल्या आहेत.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महाराष्ट्रात ३५ टक्के मोठे प्रकल्प सुरूराज्यात असलेल्या पोषक वातावरणामुळे गुंतवणूक वाढत असून, महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी सुमारे ३५ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
दावोसमध्ये झाली होती चर्चा नुकतेच दावोस येथे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी एका प्रकल्पावर समाधान न ठेवता एकापेक्षा अधिक प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यात यावी, अशी मुख्यमंत्र्यांनी मित्तल यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती.