अजित पवार अन् जयंत पाटलांना दिल्लीत आमंत्रण, गृहमंत्री पे चर्चा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:14 AM2021-03-21T10:14:18+5:302021-03-21T10:45:44+5:30

परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Invitation to Ajit Pawar and Jayant Patel from sharad pawar in Delhi, will be the future of anil Deshmukh? | अजित पवार अन् जयंत पाटलांना दिल्लीत आमंत्रण, गृहमंत्री पे चर्चा ?

अजित पवार अन् जयंत पाटलांना दिल्लीत आमंत्रण, गृहमंत्री पे चर्चा ?

googlenewsNext
ठळक मुद्देविशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी दिल्लीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलंय. 

नवी दिल्ली - मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला आहे. त्यांच्या या पत्रामुळे राज्यात भूकंप झाला आहे. तर अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, विरोधकांकडून जोर लावून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. याप्रकरणी आता दिल्लीत खलबतं सुरू आहेत. 

परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे. परमबीरसिंग यांच्या पत्रामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी दिल्लीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलंय. तर, संजय राऊत हेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनिल देशमुख म्हणाले होते, "विदर्भामध्ये मिहान प्रकल्पामध्ये एक मोठा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शरद पवारांनी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, त्यासाठी संपूर्ण डिटेल्स देण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली. या प्रकल्पामुळे विदर्भातील रोजगारात वाढ होईल." ही चर्चा करताना मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं होतं. तसेच, लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना, जेव्हा शरद पवार सांगतील तेव्हा, मी राजानामा देईन, असे देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. आता, सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास दिल्लीत शरद पवारांसमवेत अजित पवार आणि जयंत पाटील यांची बैठक होणार असल्याचे समजते. त्यामुळे, या बैठकीकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे हे दोन्ही नेते आज सकाळी पंढरपूर दौऱ्यावर असून पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आज उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात येणार आहे. या निवडीनंतर ते दिल्लीत शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याचे समजते.  

फडणवीसांकडून राजीनाम्याची मागणी

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले. तर, दुसरीकडे अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत ट्विट केलंय. फडणवीस यांच्याप्रमाणेच अनेक भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.  

संजय निरुपम यांची पवारांवर टीका

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 'परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?', असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं या विषयात ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

संजय राऊत म्हणतात

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकारदेखील अडचणीत सापडलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनादेखील सरकारचा बचाव करणं अवघड होत असल्याचं दिसत आहे. 'अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं मंत्र्यांसाठी, सरकारसाठी दुर्दैवी आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,' असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
 

Web Title: Invitation to Ajit Pawar and Jayant Patel from sharad pawar in Delhi, will be the future of anil Deshmukh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.