बहराईच (उप्र): पोटापाण्यासाठी फळे विकणारी, प्रसंगी मोलमजुरी करून गुजराण करणारी अशिक्षित भानमती येत्या २२ जानेवारीला राष्ट्रपती भवनात ‘पाहुणचार’ घेणार आहे. अशिक्षित आदिवासी भानमती समाजासाठी नवा आदर्श ठरली आहे. तिच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रपती भवनाने तिला मेजवानीचे निमंत्रण दिले आहे.आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजासाठी नवा आदर्श ठरणाऱ्या १०० महिलांसाठी राष्ट्रपती भवनने मेजवानीचे आयोजन केले आहे. यात भानमतीचा समावेश आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने एका व्होटिंगद्वारे या १०० महिलांची निवड केली. यात बहराईच्या मिहिपुरवा येथील टेडिया या गावात राहणाऱ्या भानमती या अशिक्षित आदिवासी महिलेचाही समावेश आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ती मोलमजुरी करून पोटाची खळगी भरायची. २००५ मध्ये ती ‘डेव्हलपमेंट असोसिएशन फॉर ह्युमन अॅडव्हान्समेन्ट’ या स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आली आणि यानंतर तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. आपल्या अधिकारांपासून वंचित आदिवासींसाठी काम करणाऱ्या या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यात भानमतीने स्वत:ला झोकून दिले. अशिक्षित असूनही आरटीआय, मानवाधिकार, नरेगा, महिला व बाल कल्याण तसेच दारूमुक्ती अशा अनेक मुद्यांवर ती काम करीत आहे. (वृत्तसंस्था)
भानमतीला राष्ट्रपतींकडून निमंत्रण
By admin | Published: January 06, 2016 11:56 PM