नवी दिल्ली - नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नामवंत लोकांना आमंत्रित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बंगालमधील हिंसेत ठार झालेल्या मनू यांच्या मुलाने दिल्लीला जाण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या वडिलांना ठार केले. आम्हाला आनंद आहे की, आम्ही दिल्लीला जात आहोत. आता आमच्या परिसरात शांतता असल्याचे मनू यांच्या मुलाने सांगितले. मनू हे भाजपचे कार्यकर्ते होते.
भाजपकडून ५४ कार्यकर्त्यांच्या नातलगांना शपथविधीसाठी बोलविण्यात आले आहे. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. शपथविधीसाठी १६ जून २०१३ ते २६ मे २०१९ या कालावधीत राजकीय वादातून मरण पावलेल्या कार्यकर्त्यांच्या नातलगांना बोलविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.