नवी दिल्ली - आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी आपली टीम बनवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधींनी काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते आणि विधायक दलाच्या नेत्यांना रविवारी संध्याकाळी मेजवानीसाठी निमंत्रित केले आहे. या मेजवानीमध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सन्मानप्रित्यर्थ या पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या मेजवानीचा मुख्य उद्देश टीम राहुलची बांधणी सुरू करणे हा असेल, जेणेकरून 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी योग्य पूर्वतयारी करणे हा असेल, असेही सांगण्यात येत आहे.
- राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली होती. 'एकदा आग लागल्यावर ती विझवणं फार कठीण, भाजपाचे लोक संपुर्ण देशात आग आणि हिंसा पसरवत आहेत. ही हिंसा रोखण्याती ताकद फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. राजकारण जनतेसाठी आहे, पण आज राजकारणाचा उपयोग जनतेसाठी नाही, त्यांच्या विकासासाठी नाही तर त्यांना चिरडण्यासाठी होतो', अस राहुल गांधी म्हणाले आहेत. आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार असल्याचंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं, प्रेमाचं राजकारण करु असं आवाहन त्यांनी यावेळी केले.