नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रिय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक करण्यात आली आहे. बुधवारी (16 ऑक्टोबर) सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चिदंबरम यांना अटक केली आहे. तिहार जेलमध्ये बुधवारी सकाळी ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून त्यांची चौकशी करण्यात आली. जवळपास दोन तास चौकशी सुरू होती. त्यानंतर आता पी चिदंबरम यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
विशेष न्यायालयाने मंगळवारी (15 ऑक्टोबर) ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी करण्याची तसेच आवश्यकता असल्यास अटकेची परवानगी दिली होती. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसेच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकते असेही सांगितले. तिहार जेलमध्ये चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे.
चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या पत्नी नलिनी यांनी चिदंबरम यांची भेट घेतली. 'मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आलो होतो. ते व्यवस्थित आहेत. हे जे काही सुरू आहे ते राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे. हा तपास बोगस आहे' असे कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे. चिदंबरम यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची पुढील सुनावणी 15 ऑक्टोबरला झाली. त्यामध्ये न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी करण्याची तसेच आवश्यकता असल्यास अटकेची परवानगी दिली होती. त्यामुळे आता पी चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगामध्ये जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्यावेळी 'सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या भेटीमुळे मी धन्य झालो. काँग्रेस पक्ष समर्थ व शूरांचा पक्ष असून माझेही वर्तन तसेच राहणार आहे' असं ट्वीट चिदंबरम यांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले होते.