नवी दिल्ली - त्रिपुरामध्ये भाजपा आणि आयपीएफटी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून दोन दिवस उलटत नाही तोच संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या आयपीएफटीने आदिवासी समाजातील व्यक्तिला त्रिपुराचे मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. त्रिपुराचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बिपलाब देव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. प्रेस क्लब येथे झालेल्या बैठकीत आयपीएफटीचे अध्यक्ष एन.सी. देब्बार्मा यांनी आदिवासी समाजाला मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली.
भाजपाला विश्वासात न घेता त्यांनी ही मागणी केली. भाजपा आणि आयपीएफटीला जे बहुमत मिळाले ते आदिवासी मतांशिवाय शक्य नव्हते. आरक्षित एसटी मतदारसंघांमुळे आम्ही विजयी झालो. त्यामुळे आदिवासी मतदारांच्या भावना लक्षात घेऊन विजयी एसटी उमेदवारांमधून विधानसभेच्या नेत्याची निवड करावी अशी मागणी एन.सी. देब्बार्मा यांनी केली.
बिपलाब देव यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. भाजपा आणि आयपीएफटी या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन डाव्यांचा 25 वर्षांपासूनचा किल्ला उद्धवस्त केला. त्रिपुरामधील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार असलेले प्रभारी सुनील देवधर यांना विचारले असता त्यांनी आपल्याला देब्बार्मा यांच्या विधानाची कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले. मी पत्रकार परिषद पाहिलेले नाही. त्यांनी त्यांचे मत मांडले असे देवधर म्हणाले. आयपीएफटी हा स्वतंत्र राज्याची मागणी करणारा पक्ष असून भाजपाचा त्यांच्या या मागणीला अजिबात पाठिंबा नाही.