ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ माजवणा-या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसाआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना मुद्गल समितीने क्लीन चीट दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. तसेच श्रीनिवासन यांनी हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आल्याने श्रीनिवासन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपन व राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक राज कुंद्रा हे दोघे बुकींच्या संपर्कात होते असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
आयपीएलच्या सहाव्या पर्वात (साल २०१३) घडलेल्या या स्पॉट फिक्सिंगचा मुद्गल समितीने तपास केला असून एका बंद लिफाफ्यातील हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. या अहवालात श्रीनिवासन यांचा स्पट फिक्सिंगमध्ये हात नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र गुरूनाथ मय्यपनचा फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर राज कुंद्रा हाही सट्टेबाजांच्या संपर्कात होता व तो सामन्यांवर सट्टा लावत असे असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.