प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी आयुष यादव यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. ते हरियाणातील नारनौलजवळील थाटवाडी गावचे रहिवासी आहेत. त्याचे वडील बीएसएनएलमध्ये नोकरी करायचे. मात्र आयुष 8 वर्षांचे असताना त्यांचा मृत्यू झाला.
वडिलांच्या मृत्यूनंतर आयुष यांच्या आईला बीएसएनएलमध्ये नोकरी लागली. त्यांच्या आईने त्यांना शिक्षण दिलं आणि त्यांनी यशस्वी व्हावं यासाठी अथक परिश्रम घेतले. आयुष हे अभ्यासात नेहमीच हुशार होते. त्यांना बारावीनंतर एनआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यांनी एनआयटी कुरुक्षेत्र येथून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री मिळाली.
आयुष यांनी त्यानंतर नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. 2019 मध्ये, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हरियाणा लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना पोस्टिंग मिळवली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, UPSC उत्तीर्ण करण्याचे त्यांचे ध्येय होते, त्यामुळे त्यांनी तयारी सुरू ठेवली. आयुष यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि त्यांनी 2020 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षाही उत्तीर्ण केली.
550 वा रँक मिळाला आणि DANICS सेवेत निवड झाली. पण त्यांना आयपीएस व्हायचं होतं, म्हणून त्यांनी यूपीएससीसाठी पुन्हा प्रयत्न केला. 2021 च्या परीक्षेत त्यांनी 430 वा रँक मिळवला आणि त्यांचं आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. फक्त प्रयत्न करत राहिले पाहिजे, हार मानू नये हेच त्यांच्याकडून शिकायला मिळतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.