कर्नाटकातील बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्याकडून १२.५६ कोटी रुपयांचं १४.२ किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बुधवारी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, अभिनेत्री रान्या राव ही आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रामचंद्र राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या त्यांना कधीच त्यांच्या घरीही येऊ देत नव्हती. कायद्यानुसार आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.
४ महिन्यांपूर्वी झालं होतं रान्याचं लग्न
रामचंद्र राव सध्या 'कर्नाटक स्टेट पोलीस हाउसिंग एंड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड' चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी माध्यमांना सांगितलं की, कायदा आपलं काम करेल. त्याच्या मते, रान्याचं लग्न फक्त चार महिन्यांपूर्वीच झालं होतं आणि तेव्हापासून ती त्यांना भेटायला आलेली नाही. रान्या आणि तिच्या पतीच्या व्यावसायिक व्यवहारांची काहीच माहिती नाही आणि या बातमीने खूप धक्का बसला आणि निराशा झाली आहे.
"ती आमच्यापासून खूप वेगळी राहू लागली"
रामचंद्र राव म्हणाले की, रान्याचं लग्न फक्त ४ महिन्यांपूर्वीच झालं होतं पण ती आमच्यापासून खूप वेगळी राहू लागली होती. ती अशी का वागत होती हे आम्हाला समजत नव्हतं. तिने आम्हाला कधीच तिच्या घरीही येऊ दिलं नाही. नेमकं काय चाललंय हे आम्हाला कधी कळलंच नाही. अभिनेत्रीकडून एकूण १७.२९ कोटी रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या, ज्यामध्ये ४.७३ कोटी रुपयांच्या इतर वस्तूंचा समावेश आहे.
१४ किलो सोनं चलाखीने शरीरात लपवून आणणारी रान्या राव आहे तरी कोण?
३१ वर्षीय रान्या ही कर्नाटकातील चिकमंगलूरची रहिवासी आहे. तिने बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पण तिला चित्रपटसृष्टीत रस होता. म्हणूनच तिने किशोर नमित कपूर एक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं. रान्या रावने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप यांनी केलं होतं, ज्यांनी स्वतः त्यात मुख्य भूमिका साकारली होती. रान्या रावने पदार्पणानंतर २०१६ मध्ये 'वाघा' या तमिळ चित्रपटात काम केलं.