मुंबई - सध्या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एक घटना सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे, यामध्ये गुंमर गावातील कुलदीप कुमार नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गाय विकली, आणि त्यातून मिळालेल्या ६ हजार रुपयातं स्मार्टफोन खरेदी केला, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, अभिनेता सोनू सूदही मदतीसाठी सरसावला. तर, एका आयपीएस अधिकाऱ्याने 10 हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करुन गाय परत घेण्याचं सूचवलं.
सोशल मीडियातून हिमालयातील या कुटुंबीयांची बातमी व्हायरल झाल्यानंतर हजारो रुपये कुटुंबाला मदत म्हणून मिळाले. अभिनेता सोनू सूदनेही गाय परत मिळवून देण्यासाठी या दाम्पत्याचा पत्ता आणि डिटेल्स मागितले होते. तर, हरयाणील रायपूर आणि रोहतक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने या गरीब कुटुंबीयांच्या बँक खात्यात 10 हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली आहे. तसेच, आपण विकलेली गाय परत घ्यावी आणि उरलेल्या पैशातून कपडेही खरेदी करण्याचं या आयपीएस अधिकाऱ्याने सूचवलं. आर.के. वीज असे या संवेदनशील अधिकाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने गावात जाऊन याची पडताळणी केली. त्यात सत्य उघड झालं. कुलदीप कुमार यांच्याकडे ७ जनावरे आहेत, तीन महिन्यापूर्वी त्यांनी गाय विकली, पण त्याआधीच मुलीच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन खरेदी केला होता असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कुलदीप यांच्याबाबत बातमी प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाने मदतीसाठी गुंमर गावात धाव घेतली. याठिकाणी कुलदीप यांच्याकडे ७ जनावरे असून त्यांच्या दुधविक्रीतून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात असं निदर्शनास आलं.