दिल्लीतील एका आयपीएस अधिकाऱ्याने सफदरजंग रुग्णालयात गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या घटनेचं एक सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे, ज्यानंतर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
@NCMIndiaa ने केलेल्या ट्विटनुसार, रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुद्दुचेरीमध्ये डीआयजी म्हणून तैनात असलेले IPS बिजेंद्र कुमार यादव दिसत आहेत. ते नवी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलच्याडॉक्टरला धमकावत आणि शिवीगाळ करत आहे. त्यांची IPS पत्नी अनिता रॉय रुग्णालयाच्या स्पोर्ट्स इंजुरी सेंटरमध्ये दाखल आहेत. "तू जितका शिकून आला आहेस, त्याच्या दुप्पट मी शिकून आलो आहे" असं म्हणत अधिकाऱ्याने धमकावलं.
व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये यादव हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरवर प्रचंड चिडलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत पोलिसांचा ताफाही आहे. व्हिडीओ जसजसा पुढे सरकतो तसतसा ते डॉक्टरकडे बोट दाखवत म्हणतात की, तू जितका शिकून आला आहेस, त्याच्या दुप्पट मी शिकून आलो आहे. त्यामुळे तू मोठा आहेस असं समजू नकोस.
डॉक्टरांनी अधिकाऱ्याला नम्रपणे बोलण्याचा आणि शांत राहण्याचा सल्ला दिला. तेव्हा यादव यांनी उत्तर दिलं की, मी फक्त नम्रपणे बोलत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर वेगाने प्रतिक्रिया देत आहेत. यावर तात्काळ कारवाई करावी, असं अनेकांचं म्हणणं आहे.