मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या 22 ऑक्टोबर 2021 पासून राज्यभरातील चित्रपटगृहे उघडण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर फक्त सिनेप्रेमीच नाही तर चित्रपट निर्मातेही खूप आनंदी झाले आहेत. आता पुढील महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर एका पाठोपाठ एक चित्रपट येणे सुरू होईल. यातच चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमारनेही त्याच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाबाबत एक फोटो शेअर केला. पण, तो फोटो पाहून छत्तीसगडचे विशेष डीजीपी आर के विज नाराज झाले आहेत.
अक्षय कुमारनं ट्विट करत कॅप्शनमध्ये लिहीलं, 'आज अनेक कुटुंबे उद्धव ठाकरेंचे आभार मानतील! 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल आभारी आहोत. आता कोणीही थांबवणार नाही, येत आहे पोलीस. #Soooryavanshi #Diwali2021' असे ट्विट त्याने केलं. या ट्विटसोबत अक्षयने सूर्यवंशी चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. त्या इंस्पेटरची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंह टेबलावर बसलेला दिसत आहे, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अक्षय कुमार आणि अजय देवगण उभे असलेले दिसत आहेत.
हा फोटो पाहून डीजीपी आरके विज यांनी अक्षय कुमारच्या याच ट्विटला रिट्वीट करत लिहीले- ‘इंस्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब उभे आहेत. असं कधीच होत नसतं.’
यानंतर स्पेशल डीजीपी आरके विज यांच्या ट्वीटवर रिप्लाय देताना अक्षय कुमार म्हणाल- ‘हा बिहाइंड द सीन फोटो है. आम्ही कलाकार जेव्हा कॅमरा ऑन असतो, तेव्हा एकदम प्रोटोकॉलमध्ये परत येतो. देशातील पोलिसांना प्रणाम. आशा करतो की, तुम्ही चित्रपट पाहाल आणि तुम्हाला आवडेल.’