आयपीएस अधिकारी राजेंद्र प्रसाद मीणा य़ांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील जाखोडा गावचे ते रहिवासी आहेत. त्यांचं बालपण खूप संघर्षात गेलं. राजेंद्र हे पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होते आणि लहानपणापासूनच त्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा होती, पण एक दिवस त्याच्या आयुष्यात असा क्षण आला ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. वडिलांचं एका अपघातात निधन झालं.
राजेंद्र आणि त्यांच्या भावंडांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. गरीब शेतकरी कुटुंब वडिलांच्या निधनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण या कठीण काळात त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना साथ दिली. त्यांचे थोरले भाऊ हरिकेश, भरतलाल, ओमप्रकाश यांनी शेती सांभाळली. आपल्या धाकट्या भाऊ-बहिणीच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हरिकेश आपल्या अभ्यासासोबतच शेतीत पूर्णपणे गुंतला, तर भरत लाल आणि ओमप्रकाश यांनी शेतीत मदत करण्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारीही सुरू ठेवली.
वडिलांच्या निधनानंतर अगदी एक वर्षानंतर राजेंद्र प्रसाद यांची दहावीच्या बोर्डाची परीक्षा होती. कुटुंब उद्ध्वस्त झालं पण हिंमत हारली नाही आणि दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. या काळात मोठा भाऊ हरिकेश पूर्णपणे शेती सांभाळू लागला, तर भरतलाल आणि ओमप्रकाश हे सरकारी शिक्षक झाले होते. करौली येथून बी.कॉम केल्यानंतर, राजेंद्रच्या मनात विचार आला की, जर आपल्याला अधिकारी व्हायचे असेल तर आपल्याला जयपूरला जावे लागेल कारण त्यांचे सर्व शाळेतील वरिष्ठ आणि ओळखीचे लोक नागरी सेवांच्या तयारीसाठी जयपूरला गेले होते.
राजस्थान युनिव्हर्सिटी, जयपूरमधून एम.कॉम केल्यानंतर, 1992 मध्ये त्यांची ज्युनिअर रिसर्च फेलोशिपमध्ये निवड झाली आणि अभ्यास आणि इतर खर्चासोबत त्यांना दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळू लागली. यामुळे त्याला धीर आला आणि 1995 मध्ये राजेंद्र यांनी ज्युनिअर अकाऊंटेंट परीक्षा उत्तीर्ण केली आणि कोटा येथील एसपी ग्रामीण कार्यालयात नोकरीवर रुजू झाले.
एसपी कार्यालयात काम करत असताना त्यांच्या मनात स्वत: एसपी होण्याची इच्छा जागृत झाली होती. फक्त एक वर्षानंतर, 1996 मध्ये, RPSC ची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, राजेंद्र कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर झाले, पण राजेंद्र यांचे ध्येय अजून साध्य झाले नाही. राजेंद्र यांनी DANIPS (दिल्ली, अंदमान आणि निकोबार आयलंड पोलिस सर्व्हिस) परीक्षा उत्तीर्ण केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 2001 मध्ये, ते दिल्लीत एसीपी म्हणजेच अस्सिटेंट कमिश्नर ऑफ पोलीस झाले.
पोलीस सेवेत रुजू होऊनही राजेंद्रचा थांबले नाहीत. वर्ष 2022 मध्ये डीसीपीची जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या अनेक वर्षांच्या स्वच्छ रेकॉर्डनंतर त्यांची निवड करण्यात आली आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकासाठी गौरविण्यात आले. राजेंद्र यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा पदक देण्यात आले. त्याच वर्षी, चांगला सेवा रेकॉर्ड लक्षात घेऊन, त्यांना DANIPS वरून IPS म्हणून बढती देण्यात आली.
राजेंद्र प्रसाद मीणा सांगतात की आयुष्यात अनेक वेळा वाईट प्रसंग येतात पण अशा वेळी हिंमत हारता कामा नये कारण आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीत मेहनत माणसाला ध्येयापर्यंत घेऊन जाते. आज राजेंद्र प्रसाद मीणा राजस्थानच्या तरुणांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशातील तरुणांसाठी आदर्श बनले आहेत.