नवी दिल्ली : विविध निवडणुका लढविताना शैक्षणिक पात्रतेसंबंधी खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत दिल्ली न्यायालय १ आॅक्टोबर रोजी आदेश देणार आहे.महानगर दंडाधिकारी हरविंदर सिंग गुरुवारी त्याबाबत आदेश देणार होते. त्यांनी आदेशाची प्रत तयार नसल्याचे सांगत १ आॅक्टोबर रोजी सुनावणी निश्चित केली. मुक्त लेखक अहमेर खान यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर निवडणूक आयोग आणि दिल्ली विद्यापीठाने इराणींच्या पदवीबाबत दिलेली माहिती तपासल्यानंतर न्यायाधीशांनी ३ सप्टेंबर रोजी आदेश राखून ठेवला होता. इराणी यांनी निवडणूक आयोगाला शैक्षणिक पात्रतेबाबत दिलेल्या माहितीसंबंधी फाईल सापडत नसून वेबसाईटवर ती उपलब्ध आहे, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. (वृत्तसंस्था)इराणी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १९९६ मध्ये बीएची पदवी घेतल्याचा उल्लेख केला आहे, मात्र त्यासंबंधी दस्तऐवज अद्याप सापडले नसल्याचे दिल्ली विद्यापीठाने कळविले होते. (वृत्तसंस्था)-----------------------------लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार शिक्षा व्हावीइराणी यांनी हेतुपुरस्सर आपल्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. त्यांना लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ ए नुसार शिक्षा ठोठावली जावी, अशी विनंती अहमेर खान यांनी गेल्यावर्षी २० नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीत केली होती. सदर कलमानुसार प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल सहा महिने कारावास किंवा दंड किंवा दोहोंची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
इराणींना समन्सबाबत १ आॅक्टो. रोजी निर्णय
By admin | Published: September 16, 2016 1:17 AM