नवी दिल्ली: तीस वर्षांच्या इराम हबीबनं काश्मीर खोऱ्यातील पहिली मुस्लिम महिला वैमानिक होण्याचा मान पटकावला आहे. श्रीनगरमध्ये राहणारी इराम पुढील महिन्यापासून एका खासगी विमान कंपनीत रूजू होणार आहे. 2016 मध्ये काश्मिरी पंडित कुटुंबातील तन्वी रैना एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून रूजू झाली होती. तर काश्मीर खोऱ्यातील पहिली महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक होण्याचा मान आयेशा अझिझनं मिळवला होता. तिनं प्रशिक्षणार्थी वैमानिक म्हणून एप्रिल 2017 मध्ये विमान उड्डाण केलं होतं. इराम हबीबचे वडील वैद्यकीय सामग्रीचे पुरवठादार आहेत. इरामनं लहानपणीपासूनच वैमानिक व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक विमान उड्डाणाचा परवाना आवश्यक होती. तो मिळवण्यासाठी इरामनं दिल्लीत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. याआधी तिनं विमान उड्डाणाचं प्राथमिक प्रशिक्षण अमेरिकेतील मियामीमध्ये घेतलं होतं. 'काश्मीरमधील मुस्लिम मुलगी विमान उड्डाण करते, हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण मी माझं ध्येय साध्य केलं,' असं इरामनं सांगितलं.
हबीब हिला स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनेकांची बोलणी ऐकून घ्यावी लागली होती. जेव्हा ती 12वीत होती तेव्हाचं तिनं पायलट बनण्याचं ध्येय्य निश्चित केलं होतं. परंतु त्यावेळी तिला मित्र परिवार आणि पालकांनी पायलट बनण्यासाठी पाठिंबा दिला नव्हता. तिला सांगण्यात आलं होतं की, कोणतीही काश्मिरी मुलगी ही कधीही पायलट होऊ शकणार नाही. हबीब हिनं जवळपास सहा वर्षं पायलट होण्यासाठी आईवडिलांची मनधरणी केली. तणावपूर्ण काश्मीरमधल्या कोणत्याही मुलीनं व्यावसायिक पायलट बनणं योग्य नाही, असं तिच्या आईवडिलांचं म्हणणं होतं. परंतु इरामनं कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर व्यावसायिक पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. कॉलेज जीवनापासूनच इरामला पायलट बनण्याचं स्वप्न खुणावत होतं. तिने डेहराडूनच्या वानिकीमधून पदवी मिळवली. त्यानंतर तिनं काश्मीरमधल्या शेर-ए-काश्मीर विद्यापाठीतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. इराम म्हणाली, माझं स्वप्न होतं की, कधी तरी मी विमान उडवेन, वानिकीतून शिक्षणाचे धडे गिरवत असतानाच माझं हे स्वप्न मी जिवंत ठेवलं. इरामनं वानिकीमधून पीएचडी करावी, अशी तिच्या पालकांची इच्छा होती. त्यावर इराम म्हणते, मी दीड वर्षांपर्यंत पीएचडीचा अभ्यास केला. त्यानंतर मी यूएस फ्लाइट स्कूलमध्ये प्रवेश मिळवला. मला परीक्षा पास करण्यासाठी भरपूर अभ्यास आणि कठोर परिश्रम करावे लागले. यूएसमध्ये मी 260 तास विमान उडवण्याचा अनुभव घेतला. या अनुभवाच्या जोरावर मला विमान उड्डाणाचा परवाना मिळाला. त्यावेळी मी अमेरिका आणि कॅनडामध्ये व्यावसायिक विमानं उडवू लागले. परंतु मी भारतात काम करू इच्छित होती, असंही इरामनं सांगितलं आहे. त्यानुसारच इरम सप्टेंबरमध्ये भारतातल्या खासगी विमान कंपनीत कार्यरत होणार आहे. आपल्याला वैमानिक व्हायचं आहे आणि आपण त्यावर ठाम आहोत, हे पालकांना समजवण्यासाठी इरामला सहा वर्षे लागली. यानंतर तिच्या पालकांनी तिला परवानगी दिली. इरामनं देहराडूनमधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. यानंतर पुढील शिक्षणाची आणि संस्थांची माहिती तिनं स्वत:हून मिळवली. रुढी-परंपरा जपणाऱ्या मुस्लिम कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यानं तिचा हा प्रवास अतिशय खडतर होता. मात्र तरीही जिद्दीच्या जोरावर इरामनं गगन भरारीचं स्वप्न साकार केलं.