तेल अविव- सीरियामधील इराणच्या बांधकांमाना लक्ष्य करत इस्रायली रॉकेटसनी इराणला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली आहे. मध्यरात्री इराणने इस्रायलच्या ताब्यात असणाऱ्या गोलन टेकड्यांच्या क्षेत्रामध्ये 20 रॉकेट्स डागली होती असा आरोप इस्रायलने केला आहे. त्याला उत्तर म्हणून ही कारवाई केल्याचे लष्कराने स्पष्ट केले. इराण याबाबत तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गोलन हाईटसजवळ इस्रायली लष्करी दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इस्रायलने गोलन टेकड्यांवर 1967 साली ताबा मिळवला होता. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आजवर मान्यता मिळालेली नाही. गुरुवारी पहाटे इराणतर्फे सीरियात लढणाऱ्या दलाने 20 रॉकेटस डागली असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले. याबाबत बोलताना लष्कराचे प्रवक्ते ले. कर्नल जोनाथन कॉन्रीकस म्हणाले, यातील चार रॉकेटस आयर्न डोम या इस्रायली तंत्राद्वारे हवेतच पाडली गेली. उर्वरित रॉकेट्स त्यांच्या लक्ष्यावर आदळली. त्यानंतर इस्रायलने केलेल्या प्रतीहल्ल्यामध्ये इराणी इमारतींना लक्ष्य करण्यात आले. इराणी दलाच्या लॉजिस्टिक्स मुख्यालयाला प्रथम लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर दमास्कसच्या दक्षिणेस किस्वाह येथील लष्करी परिसर, इराणी दलाच्या दमास्कस विमानतळाजवळील गोदामाला लक्ष्य करण्यात आले.