लोकमत न्यूज नेटवर्क, न्यूयॉर्क/नवी दिल्ली ( Marathi News ): दक्षिण लाल समुद्रात भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजावर इराणच्या ड्रोनने हल्ला केल्याची माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे. हुथी बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात भारतीय ध्वजांकित तेल जहाज होते. हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय जहाजांवर दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली, अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे. मात्र, त्यानंतर समुद्रात ड्रोन हल्ल्याचा फटका बसलेले ‘एमव्ही साईबाबा’ नावाचे जहाज भारताचे नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय आणि अमेरिकन लष्कराने दिले.
जहाजावरील २५ क्रू मेंबर्स भारतीय असल्याचे सांगण्यात येत असून या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. जेव्हा भारताच्या अरबी समुद्रात ‘एमव्ही कॅम प्लूटो’ या व्यावसायिक जहाजावर शनिवारी संशयास्पद ड्रोन हल्ला झाल्यानंतर ही घटना घडली. जहाजाच्या चालक दलात २१ भारतीयांचा समावेश होता; परंतु हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नौदलाकडून जहाजावरील हल्ल्याचा तपास
भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मंगळुरू बंदराकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजावर संशयित ड्रोन हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. रविवारी ही माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्यावसायिक जहाज मुंबईच्या दिशेने जात होते. यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सला एमव्ही केम प्लूटोवर ड्रोन ‘हल्ला’ झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नौदल आणि भारतीय तटरक्षकांनी शनिवारी युद्धनौका आणि सागरी गस्ती विमाने तैनात करून कारवाई केली. या व्यावसायिक जहाजावर सुमारे २० भारतीय क्रू मेंबर्स होते.
अमेरिका म्हणते...
अमेरिकन लष्कराने ‘एमव्ही साईबाबा’ या तेलवाहू जहाजाला भारतीय ध्वजांकित जहाज म्हणून घोषित केले होते. हे जहाज भारताच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय नौदल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता, अमेरिकन नौदलाच्या सेंट्रल कमांडला दक्षिण लाल समुद्रातील दोन जहाजांवरून हल्ला झाल्याची बातमी मिळाली, असे अमेरिकेने म्हटले आहे.
इराणने आरोप फेटाळले
इराणने अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री अली बगेरी म्हणाले की, हुथी बंडखोरांकडे स्वतःची शस्त्रे आहेत, ते स्वतःचे निर्णय घेतात. यात आमची भूमिका नाही. हुथी बंडखोर लाल समुद्र आणि आसपासच्या भागात वारंवार जहाजांवर हल्ले करतात. त्यातूनच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत १५ जहाजांवर हुथींनी हल्ले केले असल्याचे सांगण्यात आले.
एमव्ही साईबाबा जहाजावरील सर्व २५ क्रू मेंबर्स भारतीय असल्याचे सांगितले जात आहे आणि हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एमव्ही साईबाबा हे गॅबॉन ध्वजांकित जहाज आहे आणि त्याला ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिप’कडून प्रमाणपत्र मिळाले आहे. - भारतीय लष्कर.