ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ५ - सुन्नी दहशतवादी आयएसआयएसच्या ताब्यात अडकलेल्या ४६ भारतीय नर्स मायदेशी सुखरूप परतल्या असून आज सकाळी त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. एका विशेष विमानाने त्यांना अर्बिल येथून भारतात आणण्यात आले व त्यानंतर त्या कोच्चीच्या दिशेने रवाना झाल्या.
शुक्रवारी अनेक नाट्यमय घटनांनंतर या ४६ नर्सची सुटका झाली. संघर्ष चालू असलेल्या तिक्रीत शहरातून जबरदस्तीने हलविल्यानंतर शुक्रवारी त्यांची सुटका करण्यात आली. इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे गाव असणाऱ्या तिक्रीत येथील रुग्णालयात या नर्स काम करत असत. ९ जून रोजी सुन्नी दहशतवाद्यांनी संघर्ष सुरू केल्यानंतर त्यांचे हाल सुरू झाले. गुरुवारी आयएसआयएस दहशतवाद्यांनी त्यांना जबरदस्तीने या रुग्णालयातून हलवले व २५० कि.मी. वरील मोसुल येथे नेले. अर्बिल विमानतळ मोसुलपासून ७० कि.मी.वर आहे. या नर्सची शुक्रवारी सकाळी मुक्तता करण्यात आली असून, त्यांना अर्बिल येथे पाठविण्यात आले.