ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ०३ - भारतीय रेल्वेचा अविभाज्य भाग असलेल्या 'आयआरसीटीसी' या संकेतस्थऴावर आता येत्या काही दिवसात एका मिनिटांत जवळपास ७२०० तिकिटांचे बुकिंग होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास करणा-यांसाठी एक खुशखबरच म्हणाली लागेल, कारण यामुळे तिकीट बुकिंगचा लागणार विलंब टऴणार आहे आणि जलद बुकिंग करता येणार आहे.
सध्या 'आयआरसीटीसी'वर एका मिनिटांत २००० तिकिटांचे बुकिंग होत असून याची मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती राज्य रेल्वेमंत्री मनोज सिन्हा यांनी आज लोकसभेत दिली. याचबरोबर उशिर होणा-या रेल्वेसंदर्भात सुद्धा मोबाईल 'एसएमएस'द्वारे प्रवाशांना कळविण्यात येणार आहे आणि रेल्वे स्थानकावर ४६१५ वॉटर व्हेडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुविधांमध्ये अजून वाढ करण्याचे कामही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच प्रवाशांनी तिकीट बुकिंग केल्यानंतर त्यांना बुकिंगचे स्टेटससुद्धा मोबाईल 'एसएमएस'द्वारे प्रवाशांना मिऴणार असल्याचे मनोज सिन्हा यांनी यावेळी सांगितले.