५१ दिवसांनंतर प्रवासी रेल्वे धावण्यासाठी सज्ज आहेत. १२ मेपासून विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना एअरलाइन्ससारखे जेवण मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने त्यांची नियमावली तयार केली आहे. कोरोना विषाणूचा धोका उद्भवू नये म्हणून रेल्वेने प्रवाशांना घरातून अन्न आणि पाणी आणण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांना ट्रेनमध्ये काहीतरी वेगळे खायचे असेल तर त्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील. विमानात ज्याप्रकारे खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात अगदी त्याचप्रकारे ट्रेनमध्येही खाण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
विशेष ट्रेनमधील प्रवासादरम्यान आयआरसीटीसीच्या वतीने ई-कॅटरिंगद्वारे जेवण दिले जाईल. त्याचे शुल्क प्रवाशाच्या तिकिटामध्ये जोडले जाणार नसून स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. प्रवाशांना पाण्याची बाटलीसुद्धा स्वखर्चानेच घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारची सोयीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेवर अवलंबून राहू नये. त्यासाठी "प्रवाशांना स्वत:च्या चादरी, खाण्याचे पदार्थ आणि पाण्याच्या बॉटल आणणे गरजेचे असणार आहे. भारतीय रेल्वे कोणत्याही प्रकारची जबाबदारी उचलणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
रेल्वे सुटण्याच्या दीड तास आधी स्टेशनवर यावे लागेल. थर्मल स्क्रीनिंगनंतर लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांनाच पाठवले जाईल. रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटे आधी प्रवेश मिळेल. स्टेशन आणि रेल्वेत मास्क अनिवार्य राहील. थर्ड एसीत ५२, सेकंडमध्ये ४८ प्रवासी असतील. आरोग्य सेतू अॅप आवश्यक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचल्यावर १४ दिवस क्वॉरंटाइन व्हावे लागेल.
रेल्वेने प्रत्येक डब्यात स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. तसेच ट्रेनमध्ये प्रवेश आणि उतरताना प्रवाशांना हात स्वच्छ करणे बंधनकारक आहे. त्यासाठी वेळोवेळी सॅनिटाईज करण्याचे नियम आहे. आजपासून 12 मे रोजी विशेष गाड्या रुळावर धावण्यास सुरू होणार आहेत. रेल्वेनं निवडलेल्या मार्गांवर रेल्वेच्या 15 गाड्या धावण्यासाठी सज्ज आहेत. या गाड्यांमध्ये फक्त एसी कोच असतील.