आयआरसीटीसी आणि एसबीआयनं रुपे प्लॅटफॉर्मवर कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत लॉन्च करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डमुळे डिजिटल आणि मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला. गोयल यांच्या हस्ते कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आलं. रेल्वेला आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया योजनेच्या माध्यमातून रेल्वे प्रत्यक्ष क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. रेल्वेनं मेक इन इंडियाच्या अंतर्गत अनेक कार्यक्रम हाती घेतले. एसबीआयच्या सहकार्यानं रुपे प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेले कॉन्टॅक्टलेस हे त्यापैकीच एक असल्याचं गोयल म्हणाले.ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना सुरक्षित वातावरण मिळावं या उद्देशानं एसबीआयच्या मदतीनं कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं. 'नव्या रुपे क्रेडिट कार्डमध्ये नीयर फिल्ड कम्युनिकेश (एनएफसी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पीओएस मशीनवर कार्ड स्वाईप करण्याची गरज भासणार नाही. केवळ कार्ड टॅप करून ग्राहक आर्थिक व्यवहार करू शकतात,' अशी माहिती गोयल यांनी दिली.रेल्वेच्या दैनंदिन प्रवाशांना रुपे क्रेडिट कार्डचा लाभ होईल. नव्या कार्डमुळे प्रवाशांच्या पैशांची बचत होईल. याशिवाय त्यांना खरेदी करताना व्यवहार शुल्कातही सूट मिळेल. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि एसी चेअर कारचं तिकीट बुक करताना प्रवाशांना १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.
आयआरसीटीसी, एसबीआयकडून कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च; रुपे प्लॅटफॉर्मवर करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 10:50 AM