ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १ - मणिपूरमधील मानवाधिकार कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी न्यायालयाने सुटका केल्यानंतर पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सोमवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांची न्यायलयीन कोठडीतून सुटका केली होती. शहीद मिनारजवळ इरॉम शर्मिला यांनी 'सेव्ह शर्मिला कमिटी'च्या कार्यकर्त्यांसोबत पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. सेनादलांना विशेष अधिकार देणारा कायदा(अफ्सपा) रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 15 वर्षांपासून त्या बेमुदत उपोषण करत आहेत.
जोपर्यंत माझं ध्येय पुर्ण होत नाही तोपर्यंत शहीद मिनारजवळ मी माझं आंदोलन सुरु ठेवणार आहे. सत्याचा विजय होईल यावर अजून माझा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया इरॉम शर्मिला यांनी सुटका झाल्यानंतर दिली आहे.
इंफाळमध्ये आसाम रायफल्सने 10 लोकांची हत्या केली होती त्यानंतर इरॉम शर्मिला यांनी नोव्हेंबर 2000 साली आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती. इरॉम शर्मिला यांना आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात बंदिस्त ठेवण्यात आलं होतं जिथे त्यांना जबरदस्तीने नाकाद्वारे अन्नपुरवठा केला जायचा . 19 ऑगस्ट 2014 ला सत्र न्यायालयाने इरॉम शर्मिला यांच्या सुटकेचे आदेश दिले होते मात्र काही दिवसांनी पुन्हा त्यांना अटक करण्यात आली होती.