इम्फाळ : मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला या विवाह करणार आहेत. त्यांनी त्यांचे सहकारी ब्रिटिश नागरिक डेसमंड कॉटन्हो यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण अद्याप विवाहाची तारीख निश्चित केलेली नाही; मात्र जुलै महिन्याच्या शेवटी तामिळनाडूत आपण विवाहबद्ध होऊ, असे इरोम यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.इरोम यांनी १६ वर्षे उपोषण करून मणिपूरच्या लोकांसाठी संघर्ष केला. त्यानंतर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला; मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ आठ मते मिळाली होती, त्यामुळे नाराज इरोम यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा मनोदय बोलूून दाखविला होता. (वृत्तसंस्था)विवाहाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी विवाहाबाबत आई आणि अन्य कुटुंबियांना कळविले आहे. विवाहानंतरही आपण लोकांसाठी लढत राहणार असून, पक्ष बळकट करण्याचाही निर्धार आहे. विवाहानंतरच्या जीवनाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, विवाहानंतर आपण तामिळनाडूत राहणार आहोत. इरोम यांचे नियोजित पती डेसमंड ब्रिटिश वंशाचे आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, आपले पती विवाहानंतर भारतीय व्हिसा घेऊन भारतात राहतील. डेसमंड यांचे कुटुंबीय गोव्याशी संबंधित होते. डेसमंड यांचा जन्म टांझानियात झाला. नंतर त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतले.
इरोम लग्नबेडीत अडकणार
By admin | Published: May 09, 2017 12:44 AM