कोमल गणात्रा या इंडियन रेवेन्यू सर्व्हिसमध्ये (IRS) अधिकारी आहेत. गुजरातच्या अमरेली या छोट्या जिल्ह्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास न्यूझीलंडमध्ये संपला, पण त्यांनी हार मानली नाही. आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करून आज त्या एक यशस्वी महिला आहेत. कोमल गणात्रा आज इतर महिलांसाठी आदर्श ठेवत आहे. कोमल यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. या कठीण परीक्षेची तयारी करत असताना शाळेतील शिक्षक म्हणूनही महिन्याला 5000 रुपये पगारावर काम केलं.
कोमल गणात्रा यांचंही आयुष्य खूप चांगलं चाललं होतं. सामान्य मुलींप्रमाणे त्यांनीही लग्नाचं स्वप्न पाहिलं. पण लग्नानंतर 15 दिवसांनी स्वप्न भंगलं. एनआरआय नवरा त्यांना सोडून न्यूझीलंडला गेला. त्यानंतर कोमल यांनी पालकांपासून दूर राहून एका शाळेत शिक्षिका म्हणून काम केलं आणि यूपीएससी परीक्षेची तयारीही केली. चौथ्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. कोमल यांची आयआरएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.
लग्न मोडल्यानंतर कोमल यांच्या वडिलांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला. ते म्हणाले तू खास आहेस, महत्त्वाची आहेस, तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे. तू आयुष्यात सर्वकाही करू शकते. कोमल यांनी देखील हवं ते सर्व केलं. कोमल म्हणतात, आपला विकास होण्यासाठी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागतं. कोमल गणात्रा यांनी तीन भाषांमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे.
आयआरएस अधिकारी कोमल आज चांगलं आयुष्य जगत आहेत. कोमल यांचं दुसरं लग्न नंतर गुजरातमधील ज्यूडिशियल मजिस्ट्रेट मोहित शर्मा यांच्याशी झालं. कोमल आणि मोहित यांना एक मुलगी आहे. सात वर्षांची तक्षवी गुजरातमध्ये तिच्या आजी आजोबांसोबत राहते. कोमल यांची पोस्टिंग सध्या दिल्लीत आहे. सुट्ट्यांमध्ये त्या आपल्या मुलीला भेटायला येत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.