बांगलादेशमधील घटनांमागे पाकिस्तान आहे का? राहुल गांधी यांचा सवाल; सरकार म्हणते, शक्यता नाकारता येत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:18 AM2024-08-07T11:18:47+5:302024-08-07T11:20:21+5:30
बांगलादेशमधील स्थितीबाबत मंगळवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह विविध नेत्यांनी बांगलादेशमधील स्थितीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना प्रश्न विचारले.
नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये ज्या घटना घडल्या त्यामागे विदेशी शक्तींचा विशेषत: पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे का असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वपक्षीय बैठकीत विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथविण्यात विदेशी शक्तीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनांमागे पाकिस्तान आहे का याचीही तपासणी केली जात आहे.
बांगलादेशमधील स्थितीबाबत मंगळवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह विविध नेत्यांनी बांगलादेशमधील स्थितीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना प्रश्न विचारले. सरकारने काय उपाय योजले आहेत याबद्दलही राहुल यांनी विचारले. दरम्यान बांगलादेशातील घडामोडींवर चीनचेही बारीक लक्ष असल्याचे समोर आले आहे.
भारताने बारकाईने लक्ष ठेवावे : अब्दुल्ला
शेजारील बांगलादेशातील घडामोडी पाहता भारताने अत्यंत सावध असले पाहिजे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सर्व हुकूमशहांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांना देखील “बांगलादेशसारख्याच परिस्थितीचा सामना करावा लागेल”. बांगलादेशात अनेक वर्षांपासून अशांतता आहे आणि बेरोजगारी हे त्याचे प्रमुख कारण आहे.
गुरुद्वारा, मंदिरांची सुरक्षा करा : केंद्रीय मंत्री
केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी बांगलादेशातील शीख मंदिरे आणि हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि हा मुद्दा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी लष्करी अधिकाऱ्यांपुढे मांडावा, असे त्यांनी जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ते म्हणाले की, बांगलादेशात शीखांची लोकसंख्या खूपच कमी असून, गुरुद्वारांच्या सुरक्षेबाबत चिंता आहे.
रोज विरोधात, मात्र आता दिला एकमुखी पाठिंबा
बांगलादेशातील घडामोडींमुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तीव्र धक्का बसला असून, त्यातून त्यांना सावरण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्या भावी योजना व अन्य मुद्द्यांबाबत शेख हसीना यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे भारताने ठरविले आहे, असेही ते म्हणाले. शेख हसीना यांना मदत करण्यासंदर्भात व बांगलादेशविषयी केंद्र सरकार उचलत असलेल्या पावलांना आम्ही संपूर्ण पाठिंबा देऊ राहुल गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी सांगितले. वायएसआर काँग्रेसचे नेते व्ही. विजयसाई रेड्डी, काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांनीही अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, बांगलादेशमधील घडामोडींबद्दल केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीमध्ये माहिती दिली. सर्व पक्षांनी केंद्राच्या प्रयत्नांना एकमुखी पाठिंबा दिला.
१० हजार भारतीय विद्यार्थी बांगलादेशात
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, बांगलादेशमध्ये सध्या असलेल्या १० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात भारताने बांगलादेशच्या लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी योग्य ती काळजी घेतली जाईल, असे भारताला सांगितले आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी...
बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांना मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांच्या भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.