कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची पत्नी डोना गांगुली राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या राज्यसभेच्या सदस्य होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सौरव गांगुली यांच्या घरी जेवण केले. यानंतर यासंदर्भातील चर्चांना सुरूवात झाली आहे. दरम्यान, डोना गांगुली या एक प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगना आहेत. त्या देश-विदेशात शास्त्रीय नृत्य सादर करतात.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिलीप घोष यांनी डोना गांगुली यांचे नाव घेतल्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली. राष्ट्रपती विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करतात. त्यांनी पश्चिम बंगालमधूनही कोणाला उमेदवारी दिल्यास आम्हाला आनंद होईल, असे दिलीप घोष यांनी पत्रकारांना सांगितले. पश्चिम बंगालमधून डोना गांगुली यांच्यासारखी व्यक्ती राष्ट्रपतींनी नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर गेल्यास अधिक आनंद होईल, असे दिलीप घोष यांनी पत्रकारांना सांगितले.
याचबरोबर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून याप्रकरणी माध्यमांशी बोलणे योग्य नाही. अशा प्रकरणांमध्ये केवळ केंद्रीय नेतृत्वच अंतिम निर्णय घेते, असे सुकांता मजुमदार म्हणाले. मात्र, सौरव गांगुली राज्यसभेवर गेल्यास नक्कीच आनंद होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान,पश्चिम बंगालमधील राज्यसभा सदस्य आणि अभिनेत्री रूपा गांगुली आणि माजी पत्रकार स्वप्ना दासगुप्ता यांचा कार्यकाळ संपणार आहे.
अमित शाह यांनी 6 मे रोजी सौरव गांगुलींच्या घरी केले होते जेवण भाजपशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी सौरव गांगुली यांच्या घरी 6 मे रोजी जेवण केले. यादरम्यान डोना गांगुली यांना राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याबाबत चर्चा झाली. डोना गांगुलीने त्याच दिवशी व्हिक्टोरिया मेमोरियल मध्ये नृत्यही केले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. त्यानंतर डोना गांगुलीसोबत तिच्या निवासस्थानी डिनरसाठी पोहोचले होते. दरम्यान, गेल्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सौरव गांगुलीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकते अशी चर्चा होती.