नवी दिल्ली : बनावट आणि दर्जाहीन औषधांचे उत्पादन राेखण्यासाठी देशभरातील फार्मा कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. १८ कंपन्यांचे थेट परवाने रद्द करण्यात आले असून, २६ कंपन्यांना कारणे दाखवा नाेटीस बजाविण्यात आली आहे.
देशाच्या औषध नियंत्रकांकडून गेल्या १५ दिवसांपासून धडक माेहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार २० राज्यांमध्ये तपासणी माेहीम राबविण्यात आली. त्यात ७६ औषध कंपन्यांमधील औषधांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई केली आहे. एकूण ७० कंपन्यांविराेधात माेहीम राबविण्यात आली. या कंपन्यांवर बनावट औषधनिर्मितीचे आराेप करण्यात आले हाेते. या राज्यांमध्ये कारवाई : दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा.
...ही औषधे मागविली हाेती परत
गेल्या महिन्यात गुजरातमधील झायडस लाइफ सायन्सेसने अमेरिकेतील बाजारातून गाउटवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधाच्या ५५ हजार बाटल्या परत मागविल्या हाेत्या. हे औषध शुद्धतेच्या तपासणीत अयाेग्य ठरले हाेते. चेन्नई येथील एका कंपनीने डाेळ्यांत टाकण्यात येणारे औषध परत बाेलाविले हाेते. अमेरिकेतील औषध प्रशासनाने ते खरेदीस याेग्य नसल्याचे म्हटले हाेते.
२०३ कंपन्या रडारवर
खराब औषधांचे उत्पादन करणाऱ्या २०३ कंपन्यांची ओळख आराेग्य मंत्रालयाने पटविली असून, पहिल्या टप्प्यात ७६ कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. तीन कंपन्यांना औषधांसाठी मिळालेली परवानगीदेखील रद्द करण्यात आली आहे.