हरीश गुप्ता
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत भाजपला ८० पैकी केवळ ३३ जागा जिंकता आल्यावर चिंताग्रस्त केंद्रीय नेतृत्व संघटनात्मक पातळीवर बदल करण्याच्या विचारात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किमान काही काळ तरी पदावर कायम राहू शकतात. पण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्या जागी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून परत आणले जाण्याची शक्यता आहे. चौधरी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट नेते आहेत आणि भाजपने आरएलडीशी हातमिळवणी केल्यानंतर चौधरी यांची उपयुक्तता काहीशी कमी झाली आहे. मात्र, त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे.
मौर्य हे मजबूत ओबीसी नेते असल्याने भाजपचे लक्ष ओबीसी व मागासवर्गीयांवर केंद्रित आहे. मौर्य हे २०१६ मध्ये प्रदेशाध्यक्ष होते. मात्र, २०१७ मध्ये त्यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली. तेव्हापासून त्यांचे योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद असल्याचे बोलले जाते.
नेमके काय आहे राजकारण?
nमौर्य यांनी १४ जुलै रोजी लखनौ येथे झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यसमितीच्या बैठकीत 'संघटन नेहमीच सरकारपेक्षा मोठे असते' असे सांगितले तेव्हाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मौर्य यांच्यातील मतभेदांच्या चर्चा होऊ लागल्या.
nत्यांच्या या वक्तव्याकडे आदित्यनाथ यांच्यावर हल्ला म्हणून पाहिले गेले. जे.पी. नड्डा हेही या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील निवडणुकीतील पराभवासाठी अप्रत्यक्षपणे "अति आत्मविश्वासा" ला जबाबदार ठरविले होते.
बदल कधी?
हे बदल विधानसभेच्या १० जागांच्या पोटनिवडणुकीनंतरच केले जाण्याची शक्यता आहे. भाजप नेतृत्व भलेही योगींवर फारसे खुश नसेल. पण, २०२७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी असे पाऊल अंगलट येऊ शकते. म्हणून बदलाचा धोका नसल्याचे दिसते.
मंत्र्यांवर निवडणूक जिंकण्याची जबाबदारी
लखनौ : विधानसभेच्या १० जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ॲक्शन मोडवर आहेत. बुधवारी त्यांनी ३० मंत्र्यांची बैठक घेतली.
त्यांच्यावर या १० जागा जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे. निवडणुका संपेपर्यंत मंत्र्यांना आठवड्यातून दोनदा आपापल्या भागात रात्री मुक्काम करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवाव्या लागतील.
सोशल मीडियावर मौर्य यांची पोस्ट
nउपमुख्यमंत्री मौर्य यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, संघटना सरकारपेक्षा मोठी आहे. कामगारांची वेदना ही माझी वेदना आहे.
nसंघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही, प्रत्येक कार्यकर्ता आमचा अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.