लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यंदा पार पडलेल्या नीट-यूजी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ऑप्टिकल मार्क रेकग्निशन (ओएमआर) शीटबाबत तक्रार नोंदविण्यासाठी काही कालमर्यादा घातली आहे का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (एनटीए) गुरुवारी केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मनोज मिश्रा, न्या. एसव्हीएन भट्टी यांच्या सुटीकालीन खंडपीठाने एनटीएला याप्रकरणी नोटीस जारी केली.
एका खासगी कोचिंग क्लासने तसेच नीट-यूजी परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांनी ओएमआर शीटच्या मुद्द्यावर एक याचिका दाखल केली आहे. तिची सुनावणी येत्या ८ जुलैला घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. याचिकादारांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. बसंत यांनी न्यायालयाला सांगितले की, नीट-यूजी परीक्षेला बसलेल्यांपैकी काही विद्यार्थ्यांना ओएमआर शीट मिळालेल्या नाहीत. मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेच्या ३२व्या कलमाचा हवाला देऊन एखादा खासगी कोचिंग क्लास त्या विषयावर याचिका कसा काय दाखल करू शकतो? नीट-यूजी परीक्षेत कोणत्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली आहे, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने याचिकादारांना विचारले.
‘कालमर्यादेबाबत उत्तर सादर करणार’
- एनटीएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ओएमआर शीट वेबसाइटवर अपलोड केल्या असून त्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या हे एनटीएनेच मान्य केले आहे.
- ओएमआरबद्दल तक्रारी करण्यासाठी काही कालमर्यादा आहे का, असे न्यायालयाने एनटीएला विचारले. त्यावर यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन लवकरच ओएमआरबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर न्यायालयाला सादर करू, असे एनटीएच्या वकिलाने सांगितले.
- ओएमआर शीटबद्दल तक्रार करण्यासाठी एनटीएने कोणतीही कालमर्यादा आखून दिलेली नाही, असा दावा याचिकादारांच्या वकिलाने न्यायालयात केला.
अभ्यासक्रमाबाहेरच्या प्रश्नाच्या दाव्याबाबत भूमिका स्पष्ट करावीनीट-यूजीच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न आल्याचा आक्षेप घेणारी याचिका एका विद्यार्थ्याने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. परीक्षेत भौतिकशास्त्र विभागातील रेडिओॲक्टिव्हिटी या विषयावर एक प्रश्न होता. मात्र रेडिओॲक्टिव्हिटी हा नीट-यूजी परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा भागच नसल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची कोटा येथे आत्महत्याराजस्थानमधील कोटा शहरात नीट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या १७ वर्षे वयाच्या मुलाने भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. हा विद्यार्थी १२वी इयत्तेत शिकत होता. नीट परीक्षांसाठी पूर्वतयारी करणाऱ्यांपैकी कोटा येथे यंदा जानेवारीपासून १२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षात कोटामध्ये नीट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.