हैदराबाद : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली वकिली सोडून ईशा सिंह या आयपीएस अधिकारी बनल्या. त्यांचे वडील महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी निवृत्तीनंतर वकिली सुरू केली होती. वडिलांप्रमाणेच आयपीएस व्हायचे, असा निर्धार केलेल्या ईशा सिंह यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस ॲकॅडमीमध्ये ७५ आरआर बॅचची पासिंग आऊट परेड झाली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ईशा सिंह यांच्यासह अन्य आयपीएस अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला होता. वकील असताना ईशा सिंह यांनी नेहमीच मानवी हक्क जपणुकीसाठी लढा दिला. गटारांची सफाई करताना त्यात गुदमरून मरण पावलेल्या तीन कामगारांच्या वारसदार असलेल्या विधवा पत्नींना भरपाई मिळावी म्हणून ईशा सिंह तो खटला लढल्या. या तीनही महिलांना ईशा सिंह यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई मिळवून दिली होती.वकिलीमध्ये उत्तम करिअर घडवू शकणाऱ्या ईशा सिंह यांना मात्र वडिलांप्रमाणे आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी वकिली सोडून आयपीएस होण्याकडे सारे लक्ष केंद्रित केले.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमधील आयपीएस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या पासिंग आउट परेडमध्ये ईशा सिंह यांनी प्लॅटून क्रमांक २चे नेतृत्व केले होते. ईशा सिंह यांनी बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी मिळविली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली होती. (वृत्तसंस्था)
एजीएमयूटी केडरमध्ये नियुक्तीईशा सिंह यांनी सांगितले की, माझे वडील वाय. पी. सिंह यांच्याप्रमाणेच मला आयपीएस अधिकारी व्हायचे होते. ते अतिशय कणखर व निष्पक्षपाती आहेत. आयपीएस अधिकारी ईशा सिंह यांची आता अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम व केंद्रशासित प्रदेश (एजीएमयूटी) केडरमध्ये नियुक्ती झाली आहे.