ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ११ - ईशरत जहाँ ही एक महिला होती, विद्यार्थिनी होती तिच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी एकच विचारतो की तीन दहशतवादी होते, त्यातले दोन नि:संशय पाकिस्तानी होते, त्यांच्याबरोबर ती काय करत होती असा सवाल आता तिला बनावट चकमकीत मारल्याचा आरोप असणा-या गुजरात दहशतवादवरोधी पथकाचे तत्कालिन अधिकारी डी. जी. वंजारा यांनी उपस्थित केला आहे. वंजारा यांच्यावर बनावट चकमकीत ईशरतसह चारजणांना मारल्याचा ठपका आहे. मात्र, हेडलीच्या साक्षीनंतर वंजारा यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाला पुन्हा वाचा फोडली आहे.
जे दहशतवादी शरण येतात त्यांना आम्ही पकडतो, जे गोळीबार करतात त्यांना प्रत्युत्तर दिलं जातं असं सांगत ते फेक एन्काउंटर नव्हतं असा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, गुजरात पोलीस राजकीय षडयंत्राचे बळी पडल्याचा आरोपही वंजारा यांनी केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाया केल्या जातात, आणि त्याआधारे दहशतवादविरोधी पथक काम करतं, मात्र केवळ गुजरात पोलीसांना वेगळा न्याय लावल्याचा आणि त्यामागे देश विदेशातील सूत्रांनी राजकीय षडयंत्र रचलं होतं असा आरोप त्यांनी केला आहे.
गुप्तचर खात्याच्या सूचनांनुसार आम्ही कारवाई केली होती, आमच्या मते ती नि:संशय दहशतवादीच होती असे ठाम मत वंजारा यांनी व्यक्त केले आहे. जे कोण या प्रकरणात जाणुनबुजून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना हेडलीच्या जबानीतून योग्य तो संदेश मिळाला असल्याचे मत वंजारा यांनी व्यक्त केले आहे.