श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये महिला व अल्पवयीन मुले, मुलींना अतिरेकी कारवायांत सामील करून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ व संदेशाचे वहन करण्याच्या अत्यंत धोकादायक कटाचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तचर संस्था व सुरक्षा दलांनी अलीकडेच अतिरेक्यांच्या स्लीपर सेलवर कठोर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि सीमेपलीकडील अतिरेकी संघटनांनी आपल्या कारवायांमध्ये महिला व बालकांना सॉफ्ट टार्गेट बनवल्याचे पुढे आले आहे.
दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या असलेले शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा नियंत्रण रेषेपलीकडून (एलओसी) प्रयत्न होत असल्याने भारतीय सुरक्षा दलांना आता अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचे श्रीनगर येथील चिनार कोरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजाला यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
चकमकींच्या प्रमाणातही घट
- काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले व चकमकींचे प्रमाण यावर्षी घटले. हा सकारात्मक संकेत आहे. स्थानिक लोकांचा दृष्टीकोनही खूप बदलला आहे. हाच कायम राखणे ही आता आमची जबाबदारी आहे.
- बदलत्या सुरक्षा वातावरणात आता आम्हालाही कार्यप्रणालीमध्ये बदल करावा लागणार आहे. जी-२० बैठक सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
संदेशवहनासाठी पारंपरिक साधने
अतिरेक्यांनी कारवाया तडीस नेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. बोलण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी मोबाइलसारख्या साधनांपासून आता ते दूर राहत असून त्यासाठी पारंपरिक साधनांचा उपयोग करीत आहेत. महिला व बालके या जाळ्यात अडकू नयेत, यासाठी सरकार व प्रशासनाच्या सहकार्याने लष्कर जनजागरण मोहीम राबवत आहे.
३३ वर्षांतील अतिरेक्यांची संख्या सर्वांत कमी
भारताने राबवलेल्या इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशनने अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे. बहुतांश अतिरेकी काश्मीर खोऱ्याच्या बाहेर गेले आहेत किंवा उर्वरित हालचालच करू शकत नाहीत. दहशतवादाचे अदृश्य रूप खरे चिंतेचे कारण आहे आणि आम्ही त्यावरही काम करत आहोत; परंतु, अंदाजानुसार अतिरेक्यांच्या संख्येत मागील ३३ वर्षांतील सर्वांत कमी आली आहे.
सुरक्षेत कसलीही कसूर नाही!
पाकिस्तानचे नाव न घेता लेफ्टनंट जनरल औजाला यांनी सांगितले की, काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे प्रमाण कमी झाले; परंतु, पाकिस्तानच्या पीर पंजालच्या दोन्ही बाजूंनी व त्याचबरोबर पंजाबमध्येही घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे. आम्ही यात कसूर करणार नाही.