अहमदाबाद - नुकताच अटक करण्यात आलेला इसिसचा संशयित दहशतवादी काँग्रेस नेता अहमद पटेल ट्रस्टी असणा-या रुग्णालयात काम करत होता असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केला आहे. विजय रुपानी यांनी अहमद पटेल यांच्यावर आरोप करताना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. अहमद पटेल यांनी मात्र हे आरोप निराधार असल्याचं सांगत फेटाळून लावलं आहे.
अहमद पटेल यांनी विजय रुपानी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच भाजपाला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचं राजकारण न करण्याचं आणि शांतताप्रिय लोकांमध्ये फूट न पाडण्याचं आवाहन केलं आहे. आरोपांना उत्तर देताना अहमद पटेल यांनी ट्विट करुन सांगितलं की, 'मी आणि माझ्या पक्षाने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकरिता एटीएसचं अभिनंदन केलं आहे. मी त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करतो. भाजपाकडून लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत'.
याशिवाय अहमद पटेल यांनी अजून एक ट्विट करत सांगितलं की, 'आम्ही आवाहन करतो की, निवडणूक पाहता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांना राजकीय रंग दिला जाऊ नये. दहशतवादाशी सामना करत असताना शांतताप्रिय गुजरातींमध्ये फूट पाडू नका'.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरदेखील बोलले आहेत की, 'एक दहशतवादी इतक्या मोठ्या काळासाठी त्यांच्याकडे काम करत होता, यावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं पाहिजे'. गुजरात एटीएसने दोन दिवसांपुर्वी दोन संशियत इसीस दहशतवाद्यांना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एक आरोपी कासिम भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमधील सरदार पटेल रुग्णालयात टेक्निशिअन म्हणून काम करत होता.
'काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अहमद पटेल यांनी देशाला उत्तर दिलं पाहिजे, कारण हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे', असं विजय रुपानी बोलले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोप केली आहे की, 'हा एक गंभीर मुद्दा आहे, कारण दहशतवादी त्या रुग्णालयातून अटक करण्यात आली आहे, जे अहमद पटेल चालवत होते. पटेल यांनी 2014 मध्ये राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे, पण अद्यापही रुग्णालयातील घडामोडींचे प्रमुख तेच होते. विचार करा जर दोन्ही दहशतवादी अटक झाले नसते तर काय झालं असतं. राहुल गांधी, पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. पटेल यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो'.