नवी दिल्ली - इस्लामिक स्टेट (इसिस) पासून प्रेरणा घेऊन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'हरकत उल हर्ब-ए-इस्लाम' या दहशतवादी गटाचा देशात मोठा घातपात घडवण्याचा कट राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) 26 डिसेंबर रोजी उधळून लावला होता. याप्रकरणी NIA आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पुन्हा एकदा छापेमारी केली आहे. यावेळेसही उत्तर प्रदेशातील अमरोहा आणि दिल्लीतील जाफराबाद,सीलमपूर परिसरात छापा मारण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नव्यानं मारण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून शस्त्रसाठा आणि इसिसचे पोस्टर जप्त करण्यात आले आहेत. या पाचही जणांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
(ISISच्या नवीन मॉड्युलचा NIAकेला पर्दाफाश, 16 ठिकाणांवर छापेमारी)
यापूर्वी 26 डिसेंबरला करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान 'हरकत उल हर्ब-ए-इस्लाम' संघटनेच्या 10 हस्तकांना उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते. एनआयएचे महानिरीक्षक आलोक मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हरकत उल हर्ब-ए-इस्लाम' संघटनेच्या हालचालींवर लक्ष ठेवून उत्तर प्रदेशातील मेरठ, लखनऊ, हापूड, अमरोहा आणि सेलमपूर तसंच दिल्लीतील 17 ठिकाणी टाकलेल्या धाडीनंतर एकूण 16 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले यापैकी 10 जणांना अटक करण्यात आली. हे सर्व जण 20 ते 30 वर्ष वयोगटातील आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांची माथी धार्मिक विखाराने भडकवण्यात आलेली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
(दिल्लीसह RSS कार्यालयावर हल्ल्याचा ISISचा होता कट; मोठा शस्त्रसाठा जप्त)
एनआयएच्या म्हणण्यानुासार, देशातील आणि खास करुन राजधानी दिल्लीतील महत्त्वाची ठिकाणं आणि काही राजकीय नेते या गटाच्या टार्गेटवर होते. मोक्याची ठिकाणे हेरुन तेथे रिमोट कंट्रोलनं किवा आत्मघाती स्फोट घडवून घातपात करण्याची योजना हा गट आखत होता. यासाठी बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्याचीही तयारी चालवली होती. संशयितांना जेथून ताब्यात घेण्यात आले,त्या ठिकाणाहून एक रॉकेट लाँचर, 12 पिस्तुले, अन्य शस्त्रे, 100 नवे कोरे मोबाइल फोन,135 सिमकार्ड आणि मेमरी कार्ड आणि दारूगोळ्याचा मोठा साठाही हस्तगत करण्यात आला. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या 10 जणांना 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.