अहमदाबाद : गुजरात एटीएसनं आयसिस या दहशतवादी संघटनेच्या एका संशयित ऑपरेटिव्हविरोधात अंकलेश्वर न्यायालयात एक आरोपपत्र दाखल केलंय. यामध्ये आयसिसचा संशयित ऑपरेटिव्ह उबैद मिर्झाच्या नावाचा समावेश आहे. उबैद मिर्झा स्नायपर रायफलनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्या करण्याच्या तयारीत होता. याबद्दलचा उल्लेख त्यानं एका मेसेजिंग अॅपवरही केला होता. उबैद मिर्झाचा मोबाईल आणि पेन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पेशानं वकील असलेल्या उबैद मिर्झाला गुजरात एटीएसनं 25 ऑक्टोबर 2017 रोजी अटक केली. त्याच्यासोबतच पेशानं लॅब तंत्रज्ञ असलेल्या कासिम स्तिमबेरवाला या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. हे दोघेही सूरतचे रहिवासी आहेत. कासिमनं त्याच्या अटकेच्या 21 दिवस आधी त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यानं दिली. कासिमला जमैकाला जाऊन जिहादी कारवाया करायच्या होत्या. कट्टरतावादी मौलवी शेख अब्दुल्लाह अल फैसलच्या मदतीनं त्याला या कारवाया पूर्णत्वास न्यायच्या होत्या. जमैकात जाण्यासाठी त्यानं तेथील एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. यानंतर त्याला परवानादेखील मिळाला होता. गुजरात एटीएसनं अंकलेश्वर न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात उबैद मिर्झानं केलेल्या मेसेजचा उल्लेख केलाय. 'पिस्तुल खरेदी करायचंय आणि त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन, असा मेसेज मिर्झानं 10 सप्टेंबर 2016 केला होता. मात्र तो नेमका कोणाशी संपर्क साधण्याबद्दल बोलत होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही,' असं एटीएसनं आरोपपत्रात म्हटलंय. 'मिर्झाला 11 वाजून 28 मिनिटांनी फेरारी नावाच्या व्यक्तीकडून एक मेसेज आला. मोदींना स्नायपर रायफलनं मारु, असा उल्लेख त्यामध्ये होता,' असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय.
मोदींना स्नायपर रायफलनं मारण्याचा ISचा कट होता; गुजरात ATSचं केली होती दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 4:11 PM