ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 19 - इसीसच्या संशयित 5 दहशतवाद्यांनी हरिद्वारमध्ये पार पडलेल्या अर्धकुंभ मेळ्यावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. सिरियामध्ये या सर्व दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यांच्या हॅण्डरलने माचीसच्या काड्यांपासून स्फोटकं कशी बनवायची याचं प्रशिक्षणही दिलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात सोमवारी आरोपपत्र दाखल केलं, यामध्ये ही माहिती उघड करण्यात आली आहे.
पोलिसांना घटनास्थळावरुन 65 ग्रॅम स्फोटक पावडर मिळाली होती ज्यामुळे एनआयएला तपासात मदत मिळाली. दहशतवाद्यांनी दिल्लीतही काही ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखली होती. दहशतवाद्यांकडून प्रक्षोभक साहित्य तसंच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या भडकाऊ भाषणांचे व्हिडिओ सापडले असल्याचंही एनआयएने न्यायालयात सांगितलं आहे.
एनआयएने अखलकूर रहमान, मोहम्मद अझीमुशन, मोहम्मद मेराज, मोहम्मद ओसामा, मोहम्मद इब्राहिम सय्यद आणि युसूफ अल-हिंदी यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. 25 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 18 जानेवारी 2016 रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले होते.