नवी दिल्ली : इराक व सिरियाच्या मोठ्या भागावर कब्जा मिळविल्यानंतर इसिस (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया) ही घातक दहशतवादी संघटना आता भारतात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असून, त्यासाठी ३५ जिहादी भारतात शिरले असल्याचा इशारा आयबी या गुप्तचर संघटनेने दिला आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या इशाऱ्यानुसार हे जिहादी मुंबई, चेन्नई , कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद येथे कार्यरत आहेत. काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या निदर्शनांमध्ये इसिसचे झेंडे फडकल्याच्या पार्श्वभूमीवर या इशाऱ्याचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे. आयबीने या ३५ जिहादींची यादी करुन त्याचा अहवाल गृहमंत्रालयाकडे सोपविला असून, या संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. हे लोक महानगरात इसिसमध्ये तरुणांची भरती करत आहेत. या अलर्टनुसार भारतातील तुर्कस्तानच्या कार्यालयाला धोका आहे. इराक व सिरीयातील बहुतांश निर्वासित तुर्कस्तानात गेले आहेत. भारतातही तुकरस्तानच्या कार्यालयाला धक्का पोहचवण्याचा इसिसचा उद्देश आहे. आतापर्यंत ११ भारतीय तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी इराक व सिरीयात गेले असून त्यात चौघे कल्याणचे आहेत. बाकीचे तरुण देशाातील इतर भागातून गेले आहेत असे आयबीच्या अहवालात म्हटले आहे. कल्याणचा इसिसमध्ये गेलेला अरिब माजिद हा तरुण परत आला असून तो सध्या राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए) च्या ताब्यात आहे. अर्थात बुद्धिभेद करून सुरू असलेल्या इसिसच्या भरतीला रोखण्यासाठी समुपदेशनाचा आधार घेणाऱ्या महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अलीकडेच मीरा रोडच्या (ठाणे जिल्हा)चार तरुणांना परावृत्त केले आहे. हुरियतच्या निदर्शनांमध्ये धोक्याची नांदी-इसिसने भारतात शिरकाव केल्याचा एक उघड पुरावा काश्मीरमध्ये झालेल्या हुरियतच्या निदर्शनांच्या निमित्ताने नुकताच मिळाला आहे. या निदर्शनांदरम्यान काश्मीरमध्ये फडकलेल्या इसिसच्या झेंड्यांमुळे बर्फाच्या खोऱ्यात अशांततेची ठिणगी पडल्याचा अन्वयार्थ अधोरेखित झाला होता.इसिसचा झेंडा फडकवणाऱ्या युवकांची ओळख पटली-भारतात बंदी असलेल्या इसिसचा झेंडा जम्मू-काश्मिरात फडकविण्याच्या घटनांमध्ये १२ युवकांचा सहभाग होता. गुप्तचर संस्थांकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओवरून या युवकांची ओळख पटविण्यात आली आहे. -आम्ही त्यांच्यावर करडी नजर ठेवून आहोत, असे सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. इराक व सिरियाच्या मोठ्या भागावर कब्जा मिळवणाऱ्या इसिसवर भारतात बंदी आहे.इसिसचे हे जिहादी मुंबई, चेन्नई, कोलकाता , बंगळुरू, हैदराबाद या महानगरांमध्ये सक्रिय असल्याचे इंटेलिजन्स ब्युरोचे म्हणणे आहे.
इसिस भारतात हल्ले करण्याच्या तयारीत
By admin | Published: June 19, 2015 3:37 AM