नवी दिल्ली : सीरियामध्ये अमेरिकन ड्रोन विमानाच्या हल्ल्यात आयएसआयइस (इसिस) चा दहशतवादी मोहम्मद शफी ठार झाला आहे. मोहम्मद शफी इसिसचा भारतातील प्रमुख म्होरक्या होता आणि त्याच्याकडे भारतातून इसिसमध्ये तरुणांची भरती करायची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये अमेरिकन ड्रोन विमानाच्या हल्ल्यामध्ये तो ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. युसूफ म्हणून ओळखला जाणारा शफी इसिसचा प्रमुख अबु बाकर अल बगदादीचा महत्त्वाचा सहकारी होता.
भारतात इसिसला बळ देण्यासाठी तो बगदादीला मदत करत होता. त्याने भारतातून इसिससमध्ये ३० जणांची भरती केली होती. त्यातील २३ जणांना एनआयए आणि अन्य राज्यांतील तपास यंत्रणांनी गेल्या दीड वर्षात अटक केली. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये इसिसचे जाळे उभारण्याची त्याची योजना त्याने आखली होती. मूळ कर्नाटकातील भटकळ गावचा शफी २६ वर्षांचा होता. हल्ल्यात ठार झाल्यामुळे इसिसचे भारतातील जाळे खिळखिळे झाले आहे. त्यामुळे भारतातून तरुणांच्या भरती प्रक्रियेला आळा बसेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्याचा मोठा भाऊ सुल्तान अरमानकडे गेल्या वर्षीपर्यंत भारताची जबाबदारी होती. तोही मार्च २०१५ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला.
इंटरपोलच्या वेबसाईटवरही शफीचे नाव होते. त्याने अन्सार उल तौहिद हं संघटना विसर्जित करून जुनूद अल खलिफा ए हिंदची स्थापना केली होती. इंडियन मुजाहिदीनमध्ये रियाझ आणि इक्बलाल भटकळ बरोबर मतभेद झाल्यानंतर शफी आणि सुलतानने अन्सार उल तौहिदची स्थापना केली होती. दहशतवादासाठी मिळालेल्या पैशाचा गैरवापर केल्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते.