ISKCON VS Maneka Gandhi: देशभरात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे देशातील वातावरण ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप नेत्या मनेका गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (ISKCON) यांनी ही नोटीस पाठवली आहे.
इस्कॉनवर पूर्णपणे निराधार आरोप केल्याबाबत मनेका गांधी यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. इस्कॉनचे भक्त, समर्थक आणि हितचिंतक यांचा जगभरातील समुदाय या बदनामीकारक, निंदनीय आरोपांमुळे अत्यंत दु:खी झाला आहे. इस्कॉनविरोधातील खोट्या प्रचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कोलकाता येथील इस्कॉन उपाध्यक्ष राधारमण दास यांनी मांडली.
मनेका गांधी नेमके काय म्हणाल्या होत्या?
देशातले सर्वांत मोठे विश्वासघातकी कुणी असेल तर ते इस्कॉन आहे. ते गौशाला ठेवतात, त्याबदल्यात सरकारकडून बरेच फायदे मिळतात. हल्लीच त्यांच्या अनंतपूर गौशाळेत गेले होते. तिथे एकही साधी गाय नव्हती. सर्व दुभत्या गाई होत्या. तिथे एकही वासरू नव्हते. याचा अर्थ सगळे विकले. ISKCON आपल्या सर्व गायी कत्तलखान्यात विकते. हेच रस्तोरस्ती हरे राम, हरे कृष्णा करत फिरत असतात. दूध-दूध म्हणत असतात. पण जेवढ्या गायी यांनी खाटिकांना विकल्या असतील, त्या कदाचित इतर कुणी विकल्या नसतील. जर हे असे करू शकतात, तर इतरांबद्दल काय बोलायचे, असा मोठा आणि गंभीर आरोप मनेका गांधी यांनी केला होता.
दरम्यान, मनेका गांधी यांनी निराधार व चुकीचे आरोप केले आहेत. ISKCON ने गायी व बैलांच्या संरक्षणाचा नेहमीच पुरस्कार केला आहे, त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले आहेत. हे फक्त भारतात नाही, तर जगभरात इस्कॉनने केले आहे. इस्कॉनमध्ये गायी व बैलांची सेवा केली जाते, त्यांना कत्तलखान्यांत विकले जात नाही, असा पलटवार इस्कॉनचे युधिष्ठिर गोविंद दास यांनी केला.