इस्रायलवर दहशतवादी संघटना हमासने आज भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून यात इस्रायलच्या २० जवानांचा समावेश आहे. सुमारे ५००० हून अधिक रॉकेट एकाचवेळी इस्रायलवर डागण्यात आली होती. याविरोधात इस्रायलने रणशिंग फुंकले आहे. इस्रायलचे सैनिक आणि लढाऊ विमानांनी कारवाई सुरु केली आहे. असे असताना अमेरिकेनंतर भारताने इस्रायलला आपला पाठिंबा दिला आहे.
इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आले आहे. इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे. आमचे विचार आणि प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलसोबत एकजुटीने उभे आहोत, असे मोदी म्हणाले आहेत.
इस्रायलवर हमासच्या दहशतवादी हल्ल्यावर ब्रिटन, फ्रान्ससह अनेक देशांनी टीका केली होती. मोदींनी सोशल मीडियावर या घटनेची निंदा केली आहे. हमासचे नेते मोहम्मद अल-देफ यांनी इस्रायलविरुद्ध नवीन 'अल-अक्सा फ्लड' लष्करी मोहीम सुरू केल्याची घोषणा केली, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
सालेह अल-अरौरी हा वेस्ट बँकमधील हमासचा नेता मानला जातो. त्यांनी अरब आणि इस्लामिक देशांना "ऑपरेशन अल-अक्सा फ्लड" मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. हमासला प्रामुख्याने कतारकडून मोठी आर्थिक मदत केली जाते. यानंतर अरब देशांचा समावेश आहे. यामध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश आहे. तर पाकिस्तानचे सैन्य हमासच्या दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण देते असे सांगितले जाते.