जोधपूर - आगामी लोकसभा निवडणुकीवर देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात षडयंत्र रचलं जात आहे. देशविघातक शक्तींना भारतामध्ये इस्लामिक देशांकडून फंडिग होत असल्याचा गंभीर आरोप योगगुरु बाबा रामदेव यांनी केला आहे.
जोधपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रामदेव बाबांनी हा आरोप केलेला आहे. यावेळी बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, देशामध्ये तसेच देशाच्या बाहेरही देशविघातक शक्ती आहे, त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी हजारो-लाखो कोटी रुपये फंडिग केलं जात आहे. ख्रिश्चन देश आणि इस्लामिक देशांकडून हा सगळा पैसा भारतात येतोय. नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप रामदेव बाबांनी केला.
नरेंद्र मोदींचे चरित्र स्वच्छ आहे, मोदी राष्ट्रधर्माला कर्म मानून देशसेवा करत आहे. देशातील शेतकरी, सामान्य वर्ग, सीमेवरील जवान यांच्या भविष्यासाठी ते काम करत आहे. अनेक विकास कामं त्यांनी देशात केली. शिक्षण, आरोग्याची काळजी देशाचे पंतप्रधान करत आहेत. देशातील लोकांच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी जगतात असं कौतुक करत रामदेव बाबांनी देशाचं नरेंद्र मोदींनी काय वाईट केलं? एवढं नरेंद्र मोदींबद्दल तुम्हाला वाईट का वाटतं? असा सवाल विरोधकांना केला आहे.
दरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सगळीकडे नरेंद्र मोदीचे वारे वाहत आहेत त्यामुळे जनता पुन्हा नरेंद्र मोदींनाच निवडून देईल असा विश्वास रामदेव बाबांनी व्यक्त केला.