ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. - इस्लामिक गुरू डॉ झाकिर नाईक यांच्याकडून ढाका येथल्या दोघा हल्लेखोरांनी प्रेरणा घेतल्याचे समजल्यानंतर आता राष्ट्रीय तपास पथकानं नाईक यांच्या भाषणांची छाननी सुरू केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. ढाका येथे दहशतवादी हल्ला करून 20 जणांचा बळी घेणाऱ्या अतिरेक्यांमध्ये निब्रास इस्लाम व रोहान इम्तियाझ होते, ज्यांनी नाईक यांच्या भाषणांमधून प्रेरणा घेतली होती.
नाईक यांच्यासंदर्भातली सगळी माहिती एनआयए गोळा करत असून त्यांच्यावर काही कारवाई करता येईल का याचा अंदाज घेण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुस्लीमांमध्ये नाईक यांची लोकप्रियता लक्षात घेता, सावधगिरी बाळगण्यात येत आहे. नाईक दहशतवादाचं समर्थन करतात का, जिहादच्या माध्यमातून खलिफाच्या निर्मितीला तो प्रोत्साहन देतात का, इस्लामिक स्टेटला त्यांचा पाठिंबा आहे का अशा अनेक बाबी त्यांच्या भाषणांमधून नी लेखांमधून तपासण्यात येणार आहेत. त्यांच्याविरोधात कोर्टात मांडता येईल एवढा पुरावा गोळा करता येईल का याचा अंदाज घेतल्याशिवाय कायदेशीर कारवाई होणार नसल्याचे उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या नाईक सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असून ते परत आल्यानंतर त्यांच्याशी राष्ट्रीय तपास संस्था संपर्क साधण्याची शक्यता आहे. नाईक हे बांग्लादेशमध्येही चांगलेच लोकप्रिय आहेत. याआधी इस्लामिक स्टेटला सामील व्हा असं तरूणांना आवाहन करणाऱ्या दिल्लीमधल्या अब्दुस सामी काझमी या धर्मगुरूला अटक करण्यात आली होती.
झाकीर नाईक यांनाही इंग्लंड व कॅनडामध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. द्वेषपूर्ण भाषणे करणे आणि सलाफी इस्लामचा प्रचार करणे असा ठपका त्यांच्यावर या देशांनी ठेवला आहे. नाईक यांची इस्लामिक रीसर्च फाउंडेशन ही संस्था आहे. नाईक यांची नीट चौकशी करण्याच्या NIA च्या पवित्र्यामुळे डॉ झाकीर नाईक येत्या काळात अडचणीत येण्याची शक्यता आहे.