ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ३१ - काश्मिरमध्ये इस्लामिक स्टेट्सचा व पाकिस्तानचा झेंडा फडकावण्याचा प्रकार पुन्हा घडला असून यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मिरमध्ये फुटीरतावाद्यांचा जोर वाढत असून इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी संघटनेला जर थारा मिळत असेल तर तो संपूर्ण देशासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.
याआधी ईदीच्या दिवशी श्रीनगरमध्ये इस्लामिक स्टेट व पाकिस्तानचे झेंडे फडकावण्याचा प्रकार घडला होता. आज शुक्रवारी श्रीनगरमधल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या छतावर काही तरूण इस्लामिक स्टेट व पाकिस्तानचा झेंडा फडकावताना दिसून आले. जम्मू व काश्मिर राज्य सरकारने मात्र हे अत्यंत लहान प्रमाणात घडत असून काही तरूणांची टोळकी हे उपद्व्याप करत असल्याचं आणि ही तितकी गंभीर बाब नसल्याचं म्हटलं आहे.
मात्र, केवळ झेंडे फडकावण्यावर न थांबता या तरुणांच्या टोळक्याने दगडफेकही केली असल्याने मोठ्या प्रमाणावर पोलीसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. हा झेंड्यांचा फडकावण्याचा प्रकार प्रसारमाध्यमे रंगवून सांगत असल्याचा दावा पीडीपीचे प्रवक्ते वाहिदूर रेहमान यांनी केला आहे.
काही किरकोळ तरूण हे प्रकार करत असून प्रसारमाध्यमे त्यांना मोठं करत असल्याचा आणि परिस्थिती बिघडवत असल्याचा आरोप रेहमान यांनी केला आणि अशा बातम्या न दाखवता चांगल्या बातम्या दाखवा असा सल्ला त्यांनी मीडियाला दिला आहे.
इस्लामिक स्टेटला पाठिंबा जाहीर करणा-या या समाजकंटकांवर काय कारवाई करण्यात येत आहे याबाबत मात्र रेहमान यांनी काही माहिती दिलेली नाही. दरम्यान, पोलीस या प्रकरणामागे कोण तरूण आहेत हे शोधून काढतिल आणि त्यांच्यावर कारवाई करतिल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.