ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 23 - काश्मीर तसं सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण. मात्र काश्मिरातही अनेक जण राजकारण करण्यात मश्गुल आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन विभागानं काश्मीर फोर्ट फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत हरी प्रबात टेकडीचं नाव कोहिनूर-ए-मारण असं छापलं आहे. या प्रकारानंतर जम्मू-काश्मिरातल्या पंडितांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
जम्मू-काश्मीरचं इस्लामीकरण होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. काश्मीरमधल्या काश्मिरी पंडितांची संघटना (एएसकेपीसी) आणि एपीएमसीसी या संघटनांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. पर्यटन विभागानं काही दिवसांपूर्वीच वृत्तपत्रात काश्मीर फोर्ट फेस्टिव्हल 23 ते 25 मेदरम्यान श्रीनगरमधल्या हरी प्रबातमध्ये साजरा करणार असल्याचं जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं होतं. त्या जाहिरातींमध्येच हरी प्रबात या ठिकाणाला कोहिनूर ए मारन या नावानं प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामुळे काश्मिरी पंडितांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पंडितांच्या विरोधानंतर काश्मीरचं पर्यटन विभागही खडबडून जागं झालं आहे.
यासंदर्भात आम्ही प्रकरणामध्ये लक्ष घातलं असून, निमंत्रण पत्रिकांचं वाटप थांबवण्यात आल्याची माहिती काश्मीरच्या पर्यटन विभागाकडून देण्यात आली. पनूनमधल्या काश्मीर संघटनेचे अध्यक्षांनी याचा निषेध केला. सरकारचा जम्मू-काश्मीरचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरी प्रबात हे प्राचीन नाव आहे. काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कट्टरता वाढत आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सत्तेत असूनही असे प्रकार होत असल्याबाबत पनून काश्मीर संघटनेचे अध्यक्ष अजय चरुंगूंनी खेद व्यक्त केला आहे. काश्मीरमध्ये हिंदूंच्या ठिकाणांचं मुस्लिमांच्या नावे नामकरण करण्याचा घाट घालण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.