Coronavirus: ही ड्रामेबाजी नाही का? मजुरांच्या प्रश्नावरुन राहुल गांधींवर भडकल्या अर्थमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 03:31 PM2020-05-17T15:31:44+5:302020-05-17T15:32:46+5:30
आत्मनिर्भर देशासाठीचा निर्धार सिद्धीला नेण्यासाठी भूमी, मजूर, तरलता आणि कायदा यावर आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये भर देण्यात येत आहे. हे संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे.
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारण यांनी आज आजची पाचवी पत्रकार परिषद घेऊन २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील शेवटचा टप्पाही विस्तृतपणे सांगितला. त्यामध्ये, २० कोटी जनधन खात्यात १० हजार २५ कोटी जमा केले आहेत तर ८.१९ कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये दिलेत. त्याचसोबत १४०५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत. गरीबांना जेवण दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी, काँग्रेस नेते राहुल गांधींच्या टीकेवरुन अर्थमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, राहुल गांधी रस्त्यावर मजुरांसोबत बसून चर्चा करतात, ही ड्रामेबाजी नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
आत्मनिर्भर देशासाठीचा निर्धार सिद्धीला नेण्यासाठी भूमी, मजूर, तरलता आणि कायदा यावर आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये भर देण्यात येत आहे. हे संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे. एक देश म्हणून आपण एका अतिशय महत्वाच्या वळणावर उभे आहोत. हे एवढे मोठे संकट भारतासाठी एक इशारा आहे, तो संदेश आणि संधी घेऊन आला आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं. तसेच, या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी स्थलांतरीत मजुरांसंदर्भात केलेल्या प्रश्नावरुन निर्मला सितारमण चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे शहरी भागांत राहणारे स्थलांतरित मजूर अेनेक संकटांचा आणि समस्यांचा सामना करत आपापल्या गावी परतत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुखदेव विहार उड्डानपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या अशाच काही मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. तसेच, गरीब, शेतकरी आणि कामगार यांना न्याय योजनेच्या धर्तीवर मदत करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आर्थिक पॅकेजवर पंतप्रधानांनी पुनर्विचार करावा, असेही ते म्हणाले होते.
सितारमण यांनी राहुल गांधींनी स्थलांतरी मजुरांच्या घेतलेल्या या भेटीला ड्रामेबाजी म्हटलं आहे. राहुल गांधींनी मजूरांसोबत बसून, त्यांच्याशी चर्चा करुन या कामगरांचा वेळ वाया घालवला. खरंच, मदतीसाठी गेले होते, या मजुरांसोबत चालत जाऊन, त्यांच्या हातातील सामान घेऊन जायला हवं होतं, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार आहे, तिथं का सांगत नाहीत की, आणखी ट्रेन्स मागवा आणि या कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवा. मी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना सांगू इच्छिते की, स्थलांतरी कामगांचा मुद्दा जबाबदारीपूर्वक हाताळला पाहिजे, असेही निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरकारकडून २० कोटी जनधन खात्यात १० हजार २५ कोटी जमा केले आहेत तर ८.१९ कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये दिलेत. त्याचसोबत १४०५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत. गरीबांना जेवण दिलं जातं. कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मदत केली जात आहे. २.२ कोटी बांधकाम मजुरांसाठी ३ हजार ९५० कोटी देण्यात आले आहेत. ६.८१ कोटी जनतेला उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस सिलेंडर दिलेत. १२ लाख ईपीएफओ धारकांना आगाऊ रक्कम ऑनलाइन काढता आली असंही त्या म्हणाल्या.