नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. दुपारी साडेचार वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती. शनिवारी ही बैठक कोणत्या उद्देशाने बोलावण्यात आली, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) पुढील ६ महिन्यांसाठी वाढ देण्यात आली आहे. गरिबांसाठी हा निर्णय चांगला असला तरी दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधक केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय मोदी मंत्रिमंडळात घेण्यात आला. तत्पूर्वी ही योजना ३१ मार्चला संपणार होती. मात्र, एकीकडे केंद्र सरकार या योजनेला सातत्याने मुदतवाढ देत आहे आणि दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, तेल, डाळ यांच्या किंमती भरमसाठ वाढत आहेत. त्यावरुनच, विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार अलका लांबा यांनी ट्विट करुन मोदी सरकारने दिलेल्या योजनेच्या मुतदवाढीवरुन टीका केली आहे. 90 रुपये लिटरचे पेट्रोल टाकून 1 हजार रुपयांचे सिलेंडर घेऊन घरी आल्यानंतर, 200 रुपये किलोचं तेल टाकून त्यावर मोफत धान्य योजनेतून अन्न शिजवून खायची मजा काही औरच असेल ना?, असा बोचरा सवाल लांबा यांनी विचारला आहे. लांबा ह्या सातत्याने सोशल मीडियातून केंद्र सरकारच्या धोरणांवर टिका करत असतात.
सरकारनं कोरोना काळात सुरू केली होती ही योजना - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने ही योजना (PMGKAY) सुरू केली होती. यासाठी मोदी सरकारने १.७० कोटींची तरतूद केली होती. या अन्न योजनेंतर्गत गरिबांना प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य मिळत आले आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढ
देशभरात गेल्या 2 महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये जराही दरवाढ झाली नव्हती. मात्र, निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 20 दिवसांतच पेट्रोलच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होत असून अन्नधान्य, दाळ, तेल यांच्याही किंमती वाढल्या आहेत.