भारतातील इस्रायली दूतावासाने मंगळवारी सोशल मीडियावर दोन केरळवासीयांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. हमासच्या हल्ल्यादरम्यान त्यांनी दरवाजाचे हँडल धरून आणि दहशतवाद्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखून इस्त्रायली नागरिकांचा जीव वाचवला आहे.
TOI नुसार, इस्रायली दूतावासाने X वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारतीय वीरांगणा! मूळची केरळची सबिता, जी सध्या इस्रायलमध्ये सेवा करत आहे, ती आणि मीरा मोहन यांनी मिळून इस्रायली नागरिकांचा जीव कसा वाचवला ते सांगत आहेत. हमासच्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान या धाडसी महिलांनी सेफ हाऊसचा दरवाजा उघडू दिला नाही कारण दहशतवाद्यांना आत येऊन नागरिकांना मारायचे होते.
व्हिडीओमध्ये सबिता म्हणते की, ती 3 वर्षांपासून नीर ओझ नावाच्या सीमावर्ती भागात किबुत्झमध्ये काम करत आहे. मीरा मोहनसह एएलएस आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्ध महिलेची काळजी घेत आहे. व्हिडिओमध्ये पुढे म्हटलं आहे की, मी नाईट ड्युटीवर होते आणि ड्युटी संपवून निघणार होते तेव्हा 6.30 च्या सुमारास सायरन वाजला. आम्ही सुरक्षा कक्षाकडे धाव घेतली. सायरन थांबले नाहीत आणि लवकरच आम्हाला राहेलच्या मुलीचा फोन आला की गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. त्याने आम्हाला दरवाजे बंद करून आत राहण्यास सांगितले. काही मिनिटांतच आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आणि काचा फुटल्याचा आवाज आला. दहशतवादी आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
सबिताने पुढे सांगितलं की, तिने रेचेलच्या मुलीला पुन्हा फोन केला आणि तिला काय करायचे ते विचारले. तिने आम्हाला दरवाजा पकडून ठेवायला सांगितला. आपले पाय जमिनीवर घट्ट पकडता यावेत यासाठी दोघींनी चप्पल काढल्याचे सबिताने म्हटलं. अधिकाऱ्याने सांगितले, सकाळी 7.30 वाजेपर्यंत दहशतवादी घराबाहेर होते, ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही दरवाजा पकडून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनी दरवाजावर हल्ला केला आणि नंतर गोळीबार केला. त्यांनी सर्व काही नष्ट केले.
बाहेर काय चाललं आहे याची कल्पना नसल्याचं सबिताने सांगितले. दुपारी 1 च्या सुमारास, त्यांनी पुन्हा बंदुकीच्या गोळ्या ऐकल्या: इस्त्रायली सैन्य त्यांना वाचवण्यासाठी आले होते. आमच्याकडे काहीच उरले नाही. त्यांनी मीराच्या पासपोर्टसह आमची पूर्णपणे लूट केली. आम्ही सीमेवर राहत असल्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत मी माझी कागदपत्रे एका पिशवीत ठेवली होती पण तीही काढून घेण्यात आली असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.