इस्रायल-हमासमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या. यासोबतच युद्धबंदीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा असंही सांगितलं.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भारत नेहमीच योग्य गोष्टींचं समर्थन करत आला आहे. आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी पॅलेस्टिनी जनतेचं नेहमीच समर्थन केलं आहे. गाझामध्ये अजूनही बॉम्बफेक सुरू आहे. अन्नधान्याचा मोठा तुटवडा झाला. वैद्यकीय सुविधा नष्ट केल्या गेल्या आणि सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठाही खंडित झाला आहे. संपूर्ण देश उद्ध्वस्त होत आहे."
"युद्धात 16,000 निष्पाप नागरिक मारले गेले आहेत, ज्यात 10,000 मुले, 60 पत्रकार आणि शेकडो वैद्यकीय कर्मचारी आहेत. हे आमच्यासारखे स्वप्न आणि अपेक्षा असलेले लोक आहेत. आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जात आहे. कुठे गेली आपली माणुसकी? आम्ही आमच्या पॅलेस्टिनी बंधू-भगिनींना त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात दीर्घकाळ समर्थन देत आहोत, पण आता आम्ही मागे आलो आहोत आणि त्यांच्यासाठी काहीही करत नाही."
"आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग असल्याने, जे योग्य आहे त्यासाठी उभे राहणे ही भारताची जबाबदारी आहे. शक्य तितक्या लवकर युद्धविराम सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्व शक्य प्रयत्न केले पाहिजेत" असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास संघर्षामुळे गाझामधील मृतांची संख्या 16,200 च्या पुढे गेली आहे. आणि सुमारे 42,000 जखमी आहेत. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली आहे.